– निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : मागील तीन दिवसात गडचिरोली तालुक्यातील २ निष्पाप लोकांचा नरभक्षक वाघाने बळी घेतला असून वाघाला माणसाची चटक लागल्याने आणखी निष्पाप लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व मृतकाच्या परिवाराला १५ लक्ष ऐवजी २५ लक्ष रुपयापर्यंतची मदत देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.तसेच धुंडेशिवणी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या मृतकाच्या परिवाराला आमदार डॉ.देवराव होळी यांनी भेट दिली व आर्थिक मदत करून त्यांचे सांत्वन केले.
गडचिरोली तालुक्यामध्ये वाघाने थैमान माजवले असून संपूर्ण तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. २७ जुलै रोजी जेप्रा येथील नीलकंठ मोहुर्ले व २८ जुलै रोजी धुंडेशिवणी खुशाल तुकाराम निकूरे यांचा बळी वाघाने घेतला. परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास आणखी निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामूळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आमदार आमदार डॉ.देवराव होळी यांनी केली आहे.
तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मृतकाच्या परिवाराला शासनाकडून १५ लक्ष रुपये देण्यात येते. ही रक्कम कमी असून त्यात वाढ करून किमान २५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
