THE गडविश्व
मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. यामुळे तातडीची पावले उचलण्याची आवश्यकता असून कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्स आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. या बैठकीत निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होईल.
राज्यात मिनी लॉकडाऊन?
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. त्याच संदर्भात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या बैठकीत कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेच्या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच या कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील.
पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसत आहे. पुण्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात आजपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसले तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसले तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.