साहेब, गुरूजीचा सन्मान करायचाच असेल, तर त्याच्या डोक्यावर, अंगाखांद्यावर, उरापोटावर लादलेली तेवढी अशैक्षणिक कामे काढून घ्या. त्याला मनमोकळेपणाने वावरू द्या. त्याला त्याच्या बुद्धिचातुर्याने विद्यार्थ्यांना शिकवू द्या. हे असेच शिकवा, ते तसेच शिकवा, ही चाकोरीबद्ध नियमावली बंद करा. ज्ञानदानाचे अस्सल पवित्र कार्य करणाऱ्या गुरूजीला शिक्षक म्हणण्याऐवजी अपमानीत करणारे शासकीय संबोधन शिक्षणसेवक रद्द करा. त्याआधी शिक्षकांची रिक्त पदे भरतांना शिक्षणसेवक म्हणून भरती घेतली जाते; न भूतो न भविष्यती निर्माण केलेले शिक्षणसेवक हे अप्रतिष्ठावर्धक पद आधी रद्द करा. मगच शिक्षकाच्या सन्मान व सत्कारावर छातीठोकपणे बोला. वेठबिगारी म्हणून तीन वर्षांपर्यंत शिक्षकांना अल्पशा मानधनावर मरोमार राबवून घेतले जाते. मात्र भरतीच्या वेळी त्याच्या अंगी संपूर्ण शैक्षणिक पात्रता असावी लागते. राज्यशासन व शालेय शिक्षण विभागाने आपल्या तल्लख डोक्यातून भन्नाट कल्पना रूजू घातली, की प्राथमिक ते उच्च माध्यमिक यासर्व स्तरांकरिता शिक्षण सेवकपद निर्माण केले. खरे तर येथूनच ज्ञानदात्या शिक्षकाचा सन्मान हिरावून घेतला आहे. शासनाच्या प्रत्येक विभागातील फोर्थक्लास कर्मचाऱ्याला नियुक्तीपासूनच पूर्ण पगार मिळतो. मग शिक्षणासारखे पवित्र कार्य करणार्या शिक्षकाला, शासनाच्या कल्पनेतील शिक्षणसेवकासाठी हा मायमावशीचा भाव का बरे असावा? तीन-तीन वर्षांपर्यंत तो विद्यार्थ्यांचा, समाजाचा दास- नोकर बनून कार्य करत असतो. समान काम; समान दाम अशा न्यायाची संविधानिक तरतूद असूनही शिक्षकांच्या नशिबी अशी मानहानीवजा वागणूक मिळत आहे. तोही समाजशील प्राणी आहे. त्यालाही स्वतःच्या उदरभरणासह वृद्ध मायबाप व बायकोमुले पोसावे लागतात. मग हे वेठबिगारीचे दाम का दिले जाते? मग तुम्हीच सांगा साहेब, हा शिक्षकाचा सन्मान की अपमान? याचा विचार सरकार मायबापाने थंड डोक्याने करावाच की !
केंद्रात एनडीएचे सरकार असताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र दिले होते. त्यात शिक्षक-शिक्षकेतर यांच्या वेतनावर होणारा खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. पर्मनंट शिक्षक नेमण्याऐवजी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नेमण्याचे सुचवले होते. यासाठी त्यांनी भाजपशासित राज्यांचा दाखला दिलेला होता. गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांनी अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या असून तुटपुंज्या मानधनावर शिक्षक उपलब्ध होत असल्याचे लक्षात आणून दिले गेले. मध्यप्रदेश शासनाने शिक्षण हमी योजना, राजस्थानने शिक्षाकर्मी योजना आणि गुजरातमध्ये विद्या सहाय्यक योजना या नावाने सुरू असलेल्या योजनांचा हवाला देत महाराष्ट्र शासनाने देखील दि.१० मार्च २०००पासून प्राथमिक शिक्षक तर दि.२७ एप्रिल २०००पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक या सर्वांसाठी शिक्षणसेवक कल्पना कृतीत उतरवली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील नवनियुक्त शिक्षकांना- शिक्षणसेवकांना अगदीच तुटपुंज्या संतापजनक मानधनावर काम करावे लागत आहे. याची त्यालाच लाज वाटते, मग हे बघून शासनाला आसुरी आनंद होत असेल, नाही का? डीएड व बीएड या व्यावसायिक पदव्या मिळवायच्या वरून टीईटी पास करायचे, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हायचे. हे सर्व करून नोकरी मिळाली तर तीचा फुलपेमेंट मिळत नाही, तर मिळते ते फक्त अत्यल्प मानधन, तेही सहा हजार रुपये मात्र. स्वतःचे राहणीमान चांगले ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची कसरत ते गेली वीस वर्षे शिक्षण क्षेत्रात करत आहेत. ही शिक्षणसेवक कल्पना म्हणजेच शासनाच्या भारदस्त छाताडावरचा कलंक आहे! साहेब तो समूळ नष्ट करण्याचा आपण प्रयत्न का बरे करत नाहीत? समान काम; समान दाम या न्यायानुसार एकाच स्टॉफ रूममध्ये बसून समान काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षणसेवक संबोधणे आणि तुटपुंज्या मानधनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक पिळवणूक करणे, ही भारत देशाच्या भविष्याच्या दृष्टीने हानीकारक बाब आहे, पक्के ध्यानात ठसवून ठेवाच.
ईडी सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून नको नको ते आदेश काढत आहे. गोविंदाना ५ टक्के आरक्षण देण्याचा सरकारने आदेश काढून अनेकांचा रोष ओढवून घेतला. दहीहंडीला राष्ट्रीयखेळाचा दर्जा देण्याचा व गोविंदाना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा कोणताही विचार न करता, उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, या म्हणीप्रमाणे केली आहे. आता ईडी सरकारने शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आपले गुरुजी या गोंडस शीर्षकाखाली शिक्षकाचे फोटो वर्गात लावण्याचा शासननिर्णय निर्गमित केला व या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देशही देण्यात आले आहेत. शिक्षकांचे फोटो वर्गखोलीमध्ये लावण्याचे कारण काय? तर म्हणे, विद्यार्थ्यांना शिक्षकाचा सन्मान वाटावा. यामुळेच शिक्षकांचा सन्मान होईल का? आधी त्याला सन्मान मिळतच नव्हता काय? खरे तर विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करतात, एवढेच नव्हेतर ते आईवडिलांपेक्षाही खुपच. एक वेळा विद्यार्थी आपल्या पालकांचे ऐकणार नाही, मात्र शिक्षकांची हमखास आज्ञा पाळतात. ते त्यांना आपले आदर्श मानतात, आदर करतात. फोटो लावल्यानेच विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करतील, अन्यथा नाही. ही बिनबुडाची कपोलकल्पित कल्पनाच शिक्षणतज्ज्ञांना का सुचली असावी? शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांकडून नव्हे तर सरकार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्हावयास पाहिजे. या वेळकाढू संकल्पनेच्या आडून शिक्षकांचे खच्चीकरण करण्याचा सरकार व शिक्षण विभागाचा मनसुबा आहे, हेच सिद्ध होते. शिक्षण सेवकपद आणून शिक्षकाला सेवक- दास बनवून टाकले. देशाला उन्नत बनविणाऱ्या शिक्षकाला हातावर पोट असणाऱ्या मजुराहूनही मजूर प्रदर्शित करत आहे, हे लांच्छनास्पदच!
शिक्षक हा विद्यार्थी व शिक्षण यांना जोडणारा दुवा आहे. तो एक सर्वोत्कृष्ट समाजनिर्माता आहे. समाजाचा चांगला मार्गदर्शक व विद्यार्थी घडविणारा शिक्षक आदर्श असतो, काही अपवाद असतीलही, परंतु शिक्षकच विद्यार्थ्यांचे गुरू असतात. त्यासाठी शिक्षकांचा फोटो वर्गात लावण्याची गरजच नाही. शाळा व महाविद्यालयात फोटो संत-महापुरुष, राष्ट्रपुरुष, क्रांतिवीर, थोर व महामानव यांचे लावले जातात, शिक्षकांचे नाही. शिक्षण घेत असताना शाळा, महाविद्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रास जीवन वाहिलेल्या महान व्यक्तींचे फोटो आपण पाहात आलो. आता मात्र वर्गांमध्ये शाळेच्या शिक्षकाचे फोटो लावावे, अशी अफलातून कल्पना नवे ईडी सरकार अमलात आणू पाहात आहे. ही तर शिक्षकांची टर उडवत केलेली शुद्ध अवहेलनाच आहे! नुकताच एका लोकप्रतिनिधीने शिक्षकांवर फुकटे, चोर, ऐतखाऊ अशा अर्थाच्या शब्दांतून मुक्ताफळे उधळली. प्रत्येक शिक्षकांने मुख्यालयी राहिलेच पाहिजे, असा पोकळ व निराधार सूर काढला. कोणीही यावे आणि टपली मारून जावे, असाच हा काहीसा प्रकार लोकप्रतिनिधी म्हणून वायफळ बाता ठोकणाऱ्या निर्बुद्ध लोकांकडून सातत्याने होत आहे. शासन विद्यार्थ्यांसाठी शाळा इमारत, मुतारीगृह, शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, यासह इतरही अनिवार्य सोयीसुविधा पुरवत नाही. तेथे शिक्षक मुख्यालयी राहावे, अशी सक्तीची भाषा करणे हास्यास्पद नव्हे काय? कारण शासनाचा जीआर आहे, की जेथे शासनाने कर्मचारी निवासस्थान उपलब्ध करून दिलेले नाहीत, तेथे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास सक्ती करू नये किंवा त्यांचा घरभाडे भत्ता गोठविला जाऊ नये. आता बोला, हे महाशय यापासून अनभिज्ञ आहेत, हे नक्की! मग उगीचच अशा निरर्थक पोकळ वल्गना काय कामाच्या?
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे- अलककार.
गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.