मराठमोळ्या माणसांचा महामेळावा !

251

पहिली जागतिक मराठी परिषद विशेष

१२ व १३ ऑगस्ट १९८९ हे दोन दिवस मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला जोडून रवींद्र नाट्यमंदिरात नाट्यमहोत्सव, तसेच नेहरू सेंटरमध्ये चित्रपटविषयक प्रदर्शन, ग्रंथजत्रा, स्मरणयात्रा आणि कलावंतांच्या मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम २० ऑगस्टपर्यंत चालणार होते. त्यांत भाग घेण्यासाठी मराठी जगतातील यच्चयावत तारेतारका आणि अग्रणी महाराष्ट्रातून, बृहन्महाराष्ट्रातून आणि जगभरातून मुंबईत दाखल झाले होते. १२ ऑगस्टचा षण्मुखानंदमधील उद्घाटन सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारात शिल्पकार रा.ब.गणपतराव म्हात्रे यांची मंदिराकडे जाणारी सुभगसुंदर तरुणी सर्वांचे स्वागत करत होती. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कविवर्य कुसुमाग्रज होते. उद्घाटक म्हणून नरसिंहराव यांची योजना झाली होती. प्रमुख पाहुण्या मॉरिशसच्या मंत्री शीलाबाय बापू होत्या. स्वागताध्यक्ष स्वत: मा.शरद पवार होते. शिवाय पु.ल.देशपांडे एक वक्ता म्हणून उपस्थित होते. सभागृहात साडेतीन हजार निमंत्रितांची खचाखच गर्दी झाली होती. बाहेर पाऊस पडत होता, आत स्वरांची बरसात सुरू होती. स्वागतगीत गाण्यासाठी दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी लताताई मंगेशकरसह मीना, उषा, हृदयनाथ ही भावंडे उपस्थित होती. सुरात सूर मिसळून जेव्हा ते सर्वजण महाराष्ट्रगीत गाऊ लागले तेव्हा प्रत्यक्ष देवगंधर्व तिथे उतरल्याचा भास झाला. मराठी माणसांच्या या महामेळाव्याला जणू काही त्यांचा कौलच मिळाला होता.
मुंबईत पहिली जागतिक मराठी परिषद भरली. त्या घटनेला आज १२ ऑगस्ट रोजी ३३ वर्षं पूर्ण होतात. सन १९८९ साली हा फार मोठा उत्सव साजरा झाला होता. याची आज फार थोड्यांना माहिती असेल. मात्र ज्या भाग्यवंतांनी तो “याचि देहि याचि डोळा” पाहिला आणि त्यात भाग घेतला, ते आजही तो विसरले नसतील. अनेक दृष्टींनी तो एक चित्तचक्षुचमत्कारिक आणि भव्य असा महोत्सव होता. केवळ त्याची आठवणही आज मनांमनात एक थरार जागा करत शरीरावर रोमांच उभे करते. त्यावेळी मा.शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. डॉ.रवी बापट, बी.के.देसाई व माधव गडकरी अशा काही विचारवंत स्नेह्यांनी त्यांना जागतिक मराठी परिषद भरवावी, अशी अनोखी सूचना केली होती. तोपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी कुठे ना कुठे होतच असे, पण ते केवळ साहित्याला वाहिलेले असे. जागतिक मराठी परिषदेची संकल्पना त्याहून वेगळी होती. जगभरातल्या मराठी माणसांना एकत्र येण्यास एक व्यासपीठ निर्माण करायचे होते. त्यांत साहित्यिक तर असणारच होते, पण सर्व कलाशाखांतील कलाकार, चित्रकार, शिल्पकार, गायक, वादक, नर्तक, संगीतकार, नाट्य-चित्रपट कलावंत, व्यापारी-उद्योजक, कारखानदार, धडाडीचे नेते व कार्यकर्ते, राजकीय-सामाजिक क्षेत्रांतले पुढारी आणि सर्वसामान्य रसिकजन या सर्वांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी हे व्यासपीठ मदत करणार होते. कल्पना तर भव्यच होती व ती पवार साहेबांनी उचलून धरली. साथीला मनोहर जोशी आले व केवळ तीन महिन्यांच्या अविश्रांत मेहनतीनंतर ती कल्पना प्रत्यक्षातही आली.
मा.शरद पवार साहेबांनी जागतिक मराठी परिषदेची संकल्पना स्पष्ट केली, की मराठी भाषेच्या, मराठी भाषिकांच्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित प्रयत्न करणे, हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. अशा प्रयत्नांसाठी जगातील विविध क्षेत्रांतील मराठी भाषिकांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच या परिषदेच्या रूपाने एकत्र येत आहेत. मातृभाषा हे व्यक्तीच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम मानून ते या ठिकाणी विचारविनिमय करत असल्याचे सांगितले. कुसुमाग्रजांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयीची आपली मते मांडली. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, की कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचे दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. २५ वर्षांनंतर आजही कुसुमाग्रजांची ही व्यथा जिकडे तिकडे उद्धृत केली जाते परंतु अजूनही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही.
नेहरू सेंटरमध्ये झालेला सर्वांत अविस्मरणीय कार्यक्रम म्हणजे स्मरणयात्रा होय. सुधीर मोघे यांच्या संकल्पनेवर आधारित आणि त्यांनीच शब्दबद्ध केलेला हा मराठी चित्रपटसंगीताचा प्रवास होता. सुरुवातीला सुधीर मोघ्यांनी प्रस्तावना केली आणि नंतर तीन-साडेतीन तास अवीट मेजवानी मिळाली. सुधीर गाडगीळ आणि शैला मुकुंद यांनी अत्यंत बहारदार निवेदन केले. श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे, रंजना पेठे-जोगळेकर, अनुराधा मराठे, मृदुला दाढे, त्यागराज खाडिलकर आणि इतर गायकांनी मराठी चित्रपटसंगीताचा इतिहास सुमधुर गायनातून जिवंत केला. रसिकांचा जीव तृप्त झाला. आजही ही स्मरणयात्रा रसिकांच्या स्मरणातून गेलेली नसेल. या जागतिक मराठी परिषदेची एवढी आठवण कशामुळे होते? तर परिषदेचे कार्याध्यक्ष माधवराव गडकरी, सचिव डॉ.रवी बापट व भा.कृ.देसाई, कोषाध्यक्ष अरुण डहाणूकर हे सर्व प्रा.प्रभुराम जोशी यांचे स्नेही होत. त्यामुळे परिषदेच्या संकल्पनेपासून ते आयोजनापर्यंत ते त्यात पहिल्या दिवसापासून आकंठ बुडलेले होते. जेव्हापासून ही परिषद होणार, असे जाहीर झाले होते तेव्हापासून सर्व संबंधितांमध्ये आणि इतरत्र एक अभूतपूर्व उत्साह संचारला होता. अनेकजण स्वयंस्फूर्तीने काम करायला पुढे येत होते. मराठीसाठी काहीतरी होणार, अशी आशा सर्वत्र भरून राहिली होती. माधवराव गडकरी यांनी स्वत:हून सुचवले, की त्यांनी ग्रंथजत्रेचे आयोजन करावे व त्याप्रमाणे त्यांनी पत्रही लिहिले. मग काय? ही परिषद म्हणजे एक अभूतपूर्व स्तरावरचे, आश्चर्यजनक आयोजन होते. रवींद्र नाट्यमंदिरात जो नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक होते. ते म्हणजे अमेरिकास्थित दिलीप वि.चित्रे यांचे अलिबाबाची हीच गुहा. त्यात सर्व अमेरिकेत राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या मुलामुलींनी कामे केली होती. शिवाय इतर आपल्याकडची नाटके व शाहीर साबळे यांची महाराष्ट्राची लोकधारा होतीच. नेहरू सेंटरमध्ये तर रसिकांना तऱ्हेतऱ्हेची मेजवानी होती. चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, विनय नेवाळकर आदींच्या अथक प्रयत्नांतून तिथे एक भव्य प्रदर्शन उभारण्यात आले होते. त्यात मराठी चित्रपटसृष्टीचा संपूर्ण इतिहास जिवंत करणारी असंख्य छायाचित्रे, शांबरिक खरोलिके पासून ते बाबुराव पेंटरांच्या कारकीर्दीवरच्या दालनापर्यंत अनेक अनवट गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला व्ही.शांताराम, शांता हुबळीकर, ललिता पवार, शाहू मोडक, बेबी शकुंतला, सुधीर फडके यांच्यासह अनेक दिग्गजांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्याशिवाय दररोज जुने नवे चित्रपट दाखवण्यापूर्वी त्यांतल्या कलावंतांबरोबर गप्पा आणि आठवणींची उजळणी झाली, ती वेगळीच!
दुसऱ्या दालनात ग्रंथजत्रा भरवण्यात आली होती. मराठी प्रकाशक परिषदेच्या सहकार्याने इथे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन मांडले होते. मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा.अ.चिं.टिकेकर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अच्युत तारी यांच्या सहकार्याने अतिशय देखणे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे प्रदर्शन झाले होते. मराठीमध्ये तोपर्यंत जितक्या पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले होते, ती सर्व पुस्तके प्रयत्नपूर्वक मिळवून तिथे मांडलेली होती. तसेच पुण्याचे विख्यात चित्रकार म.वि.सोवनी यांनी काढलेल्या सुंदर चित्रांतून मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा प्रवास अधोरेखित केला होता. अगदी महानुभाव काळापासून ते चालू सन १९८९ पर्यंत. कोल्हापूरचे राम देशपांडे यांनी जमवलेला ऐसी अक्षरे हा हस्ताक्षर संग्रहदेखील तिथे होता. तसेच कविवर्य मोरोपंतांची लेखणी, दौत आणि टाकसुद्धा ठेवण्यात आले होते. कविवर्य कुसुमाग्रजांनी या प्रदर्शनाचे विशेष कौतुक केले.

अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
[म. रा. डि. शै.]
गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here