भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान !

231

राजीव गांधी जयंती विशेष

राजीवजी गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिराजी गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स.१९८०मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते सन १९८४मध्ये पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. राजीवजी गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिराजी गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीवजी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिराजी गांधींच्या निधनानंतर दि.३१ ऑक्टो.१९८४ ते दि.२ डिसे.१९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते चाळीशीतील भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले होते. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स.१९८८मध्ये राजीवजींनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर सन १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. ते त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. सन १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.
राजीवजी गांधी यांचा जन्म मुंबईमध्ये दि.२० ऑगस्ट १९४४ रोजी झाला. वडील फिरोज गांधी आणि आई इंदिरा गांधी यांचे ते मोठे अपत्य होते. त्यांचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स.१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद- प्रयागराज येथे स्थायिक झाले. पण इ.स.१९४९च्या सुमारास इंदिराजी व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिराजी मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स.१९६०मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुरवातीचे शिक्षण देहरादून येथील प्रसिद्ध दून शाळेत झाले. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या कैम्ब्रिज यूनिवर्सिटीच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले. सन १९६५ साली तेथून त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. लंडनमध्ये शिक्षण घेत असतांना त्यांची ओळख सोनियाजींसोबत झाली. सन १९६८मध्ये त्या दोघांनीही पारंपारिक पद्धतीने विवाह केला. इ.स.१९६७मध्ये आई इंदिराजी गांधी या भारताच्या पंतप्रधान बनल्या, तरी राजीवजी राजकारणापासू दूर रहात असत. ते इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले. त्यांना इ.स.१९७०मध्ये राहुल तर इ.स. १९७२मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली. इ.स.१९८०मध्ये लहान भाऊ संजयजी गांधी राजकारणात सक्रिय होते. त्यांचा विमान अपघातात मृत्यु झाल्यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीवजी यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीवजी व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये त्यांनी केली होती, तरी पुढे विचार बदलून इ.स.१९८१मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा दोन लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले. दि.३१ ऑक्टोंबर १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीवजी गांधींवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच त्यांनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठ्या बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदाच झाला. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले, तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.
इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. त्यांनी उद्गार काढले म्हटले जाते, की जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजूची जमीन हादरणे सहाजिकच आहे. या व्यक्तव्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. लोकसभा निवडणूक प्रचारसभेदरम्यान लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. धनू नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीवजी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा त्यांच्या महिला सुरक्षारक्षकाने तिला अडविले. पण राजीवजींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनू त्यांच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीवजींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. तो दुर्दैवी दिवस होता दि.२१ मे १९९१. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला, परंतु घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच, शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here