पोलीस-नक्षल चकमक :  दोन नक्षलींना कंठस्नान

2623

– अनेक घटनात होता सहभाग, लाखोंचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
कांकेर, १ नोव्हेंबर : कांकेर जिल्ह्यातील कडमे या नक्षलग्रस्त भागातील जंगल परिसरात सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली यात दोन नक्षलींना कंठस्नान घालण्यास पोलीस दलास यश आले आहे. घटनास्थळावरून नक्षल्यांची स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.
सदर घटनेला कांकेरचे एसपी सुलभ सिन्हा यांनी दुजोरा दिला असून सांगितले की, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान, डीआरजी आणि बीएसएफ 81 बटालियनचे जवान रात्री उशिरापासून शोध मोहिमेवर होते. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास कडमे या नक्षलग्रस्त भागात घनदाट जंगलात पोलीस-नक्षल चकमक उडाली, ही चकमक सुमारे २ तास चालली व जवानांचा वाढता दबाब पाहून नक्षली पसार झाले. नंतर घटनास्थळी जवानांनी शोध घेतला असता २ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच घटनास्थळावरून स्फोटक साहित्यही जप्त केले आहेत.
मृतक नक्षली मधील एकाची ओळख पटली असून डिव्हीसी सदस्य दर्शन पड्डा अशी आहे, जो प्रतापपूर क्षेत्र समितीचा सचिव होता आणि उत्तर बस्तर विभागाचा सदस्य होता, तर पोलीस दुसऱ्या मारल्या गेलेल्या नक्षलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठार झालेल्या दोन्ही नक्षल्यांवर ८-८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते, यापूर्वी झालेल्या जाळपोळ आणि खुनाच्या घटनेत दोघांचा सहभाग होता. घटनास्थळी १५ ते २० नक्सली उपस्थित होते असे या संपूर्ण घटनेनंतर सोमवारी दुपारी बस्तरचे आयजी सुंदरराज पी आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.

#police -naxal #firing #kanker #chhattisgarh #kanker police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here