नाना विषय संशोधनप्रवास थक्क करून टाकणारा !

199

दामोदर धर्मानंद कोसंबी जयंती विशेष

_दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक जागतिक प्रतिष्ठा प्राप्त केलेले गणित आणि सांख्यिकी विषयातले तज्ज्ञ होते. त्याचबरोबर एक इतिहासतज्ज्ञ, प्राच्य भारत शास्त्राचे- इंडॉलॉजीचे व संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांना मान्यता लाभली होती. मार्क्सवादी विचारवंत आणि डाव्या चळवळीतील एक क्रियाशील नेते म्हणूनही त्यांचे नाव घ्यावे लागेल. शेवटपर्यंत त्यांचे बहुविध संशोधनकार्य अखंड चालू होते. विशुद्ध गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, अनुवंशशास्त्र, प्राचीन संस्कृत ग्रंथ, इतिहास, प्राचीन भारतशास्त्र, इतक्या विविध विषयांत मूलभूत संशोधन करणारा दुसरा कोणताही संशोधक साऱ्या जगाच्या इतिहासात झालेला नाही. ज्ञानवर्धक माहिती वाचा अलककार- निकोडे कृष्णकुमार यांच्या शब्दशैलीत…

दामोदर कोसंबींचा पहिला संशोधनपर लेख भौतिक शास्त्रातला होता. त्यानंतर ते गणितावरचे संशोधन करू लागले. अलिगड विद्यापीठात असताना दोन वर्षांत त्यांचे आठ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. गणितामधील संशोधनाचे त्यांचे काम आयुष्यभर चालूच होते. टेन्सॉर अ‍ॅनॅलिसिस व पाथ जॉमेट्री या गणिताच्या दोन शाखांमध्ये त्यांचे काम होते. आयुष्यभरात त्यांनी गणितावर एकूण ४८ संशोधनपर लेख लिहिले. पण गणिताची उपयोजित शाखा म्हणून त्यांना सांख्यिकीचे आकर्षण वाटू लागले. सांख्यिकीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्राचीन नाण्यांचा एक सांख्यिकी प्रश्‍न निवडला. नाणी जितका काळ हाताळली जातात, त्या प्रमाणात त्यांचे वजन कमी होते. त्यामुळे प्राचीन नाण्यांचा अभ्यास करून, त्या राजवटींचा काळ निश्चित करता येतो. हा अभ्यास करून त्यांनी नाणकशास्त्र या शास्त्राचा पाया घातला. नाणकशास्त्राच्या अभ्यासातून नाण्याचा काळ ठरवता येऊ लागला. पण त्या वेळेला कोणत्या राजांच्या राजवटी होत्या, हे नेमके कळत नव्हते. यातून कोसंबी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या प्रांतात शिरले. राजवटींचा नेमका शोध घेण्यासाठी ते संस्कृत शिकले; पण संस्कृत ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या मिळत होत्या व त्यात पाठभेद होते. मग कोसंबींनी संस्कृत ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्त्या बनवण्याचे काम केले. भर्तृहरीच्या काव्यावरचे त्यांचे काम आदर्श मानले जाते. विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या निदान ५० संस्कृत कवींचे काम त्यांनी उजेडात आणले. या अभ्यासातून कोसंबींना जाणवले, की संस्कृत कवींच्या रचना आणि प्रत्यक्ष समाज यांचा काहीच संबंध नव्हता, म्हणून त्या वेळच्या समाजाची व्यवस्था जाणून घेण्यासाठी त्यांनी काम सुरू केले. म्हणजेच ते इंडॉलॉजीच्या क्षेत्रात आले. अनागरी क्षेत्रातील, संस्कृतीच्या परिघावर असणाऱ्या समाज-घटकांमधील लोककथा, चालीरीती आणि मिथके यांचा त्यांनी अभ्यास केला व त्यांतून अब्राह्मणी अशा भारताच्या लोकसंस्कृतीचा वेध घेतला. प्राचीन भारताच्या अभ्यासाची हीच कोसंबींची प्रसिद्ध मार्क्सवादी पद्धत होय. याशिवाय सामाजिक प्रश्‍नांवरही कोसंबींनी विपुल लेखन केले. अण्वस्त्रांच्या विरोधात साम्यवादी मंडळींनी सन १९५० सालाच्या सुमारास जागतिक शांतता चळवळ सुरू केली, त्यात कोसंबी सक्रिय होते. अण्वस्त्रांच्या व पर्यायाने अणुऊर्जेच्या विरोधात आणि सौरऊर्जेचा पुरस्कार करणारे लेखही त्यांनी लिहिले आहेत. सांख्यिकीचा वापर करून त्यांनी गुणसूत्रांच्या संदर्भात कोसंबी फॉर्म्युला शोधला, ज्याचा आजही अभ्यास केला जातो.
दामोदर कोसंबी यांचा जन्म दि.३१ जुलै १९०७ रोजी गोव्यातील कोसबेन या गावी झाला. त्यांचे वडील धर्मानंद कोसंबी हे संस्कृतचे, पाली भाषेचे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे विद्वान होते. अत्यंत खडतर परिस्थितीशी झुंजून धर्मानंदांनी या विषयाचे शिक्षण प्राप्त केले होते व या विषयातील त्यांचा अधिकार भारतात आणि युरोप- अमेरिकेतही मान्यता पावला होता. विद्वान आणि संशोधनाची नेमकी शिस्त असणाऱ्या पित्याच्या सहवासात मोठे झाल्याचा फार मोठा फायदा दामोदरांना झाला. अभ्यासाची व संशोधनाची पद्धत त्यांना लहानपणापासूनच बघता आली, शिकता आली. पाली भाषेतील ग्रंथाचे संशोधन करण्यासाठी धर्मानंदांना अमेरिकेत हॉर्वर्ड विद्यापीठात निमंत्रण आले. त्या वेळी अकरा वर्षांच्या असलेल्या दामोदरांना ते बरोबर घेऊन गेले. मग दामोदरने तिथल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायला सुरुवात केली व नंतर तिथल्या केंब्रिज हाय अ‍ॅण्ड लॅटिन स्कूल या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. चार वर्षांनंतर धर्मानंद भारतात परतले, ते दामोदरांना अमेरिकेत ठेवूनच! मग त्यांनी अमेरिकेतच हॉर्वर्ड विद्यापीठात गणित विषयाचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. प्रा.जॉर्ज बरकॉफ हे त्यांचे गणितातले गुरू होते. गणित या विषयाने त्यांना झपाटून टाकले होतेच; पण त्याच्या जोडीलाच त्याने इतिहास, समाजशास्त्र, अनेक भाषा यांचाही अभ्यास केला. विद्यापीठातील प्रसिद्ध ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ घेतला. कोणत्याही विषयाचा अभ्यास मुळापासून करण्याची शिस्त अंगी बाणवून घेतली. वयाची ११ ते २१ अशी अत्यंत महत्त्वाची वर्षे त्यांनी अमेरिकेत काढली व तिथले संस्कार आणि शिक्षणासोबत सन १९२९ साली ते गणितातली पदवी घेऊन भारतात परतले. त्यांना पदवी परीक्षेत अतिशय उत्तम यश मिळाले. पण त्याच वेळेला अमेरिकेत मंदीची लाट आली असल्यामुळे त्यांना अमेरिकेत राहून उच्चशिक्षण घेणे अथवा गणितातले संशोधन करणे शक्य झाले नाही. त्यांना भारतात परतावे लागले. याचा परिणाम म्हणून की काय? त्यांच्या स्वभावात कडवटपणाची छटा आली. भारतात आल्यावर प्रथम ते बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे अध्यापन करू लागले. नंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात गेले. पण दोनअडीच वर्षांतच ते पुण्याला आले व फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गणित शिकवू लागले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी १९३३ ते १९४५ अशी बारा वर्षे अध्यापन केले. महाविद्यालयात विद्यार्थिप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. जो विद्यार्थी स्वत: परिश्रम करायला तयार असेल, त्यालाच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होत असे. याच कालखंडात त्यांच्या संशोधनाला बहर आला. दामोदरांच्या संशोधनाचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे. एक माणूस एका आयुष्यात इतक्या विविध विषयांत संशोधन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
कोसंबींचे आयुष्यभरात सुमारे दीडशे लेख प्रसिद्ध झाले. त्यांतले साठ गणित व सांख्यिकी या विषयांवरचे होते. सुमारे साठ लेख इतिहास, नाणकशास्र व प्राचीन संस्कृत साहित्य या विषयांवर होते. एक अनुवंश शास्रावर होता. बाकीचे लेख विज्ञान व समाज यांच्या परस्परसंबंधांवर होते. कोसंबींनी लिहिलेली, संपादित केलेली व त्यांच्या लेखांचा संग्रह असलेली चौदा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांतले अ‍ॅन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी, मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलिटी आणि कल्चर अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शन्ट इंडिया हे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत. होमी भाभा यांच्याबरोबर टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या उभारणीतही कोसंबींचा मोलाचा वाटा होता. सन १९४५पासून ते या संशोधन संस्थेत होते. मात्र पुढे होमी भाभांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांना सन १९६२ साली संस्था सोडावी लागली.
दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक जागतिक प्रतिष्ठा प्राप्त केलेले गणित आणि सांख्यिकी विषयातले तज्ज्ञ होते. त्याचबरोबर एक इतिहासतज्ज्ञ, प्राच्य भारत शास्त्राचे- इंडॉलॉजीचे व संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांना मान्यता लाभली होती. मार्क्सवादी विचारवंत आणि डाव्या चळवळीतील एक क्रियाशील नेते म्हणूनही त्यांचे नाव घ्यावे लागेल. शेवटपर्यंत त्यांचे बहुविध संशोधनकार्य अखंड चालू होते. विशुद्ध गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, अनुवंशशास्त्र, प्राचीन संस्कृत ग्रंथ, इतिहास, प्राचीन भारतशास्त्र, इतक्या विविध विषयांत मूलभूत संशोधन करणारा दुसरा कोणताही संशोधक साऱ्या जगाच्या इतिहासात झालेला नाही. त्यांचे निर्वाण दि.२८ जून १९६६ रोजी झाले.
!! The गडविश्व परिवारातर्फे जयंतीनिमित्त त्यांना व त्यांच्या बुद्धिचातुर्यास विनम्र अभिवादन !!

अलककार- निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
(भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवनचरित्रांचे गाढे अभ्यासक)
गडचिरोली, व्हॉट्सॅप नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here