धक्कादायक : वाघ आणि बिबट्याची झुंज, बिबट्याचा मृत्यू

1139

– झुंजीत वाघ सुद्धा जखमी असल्याचा वनविभागाचा अंदाज
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या वाकडी गावालगतच्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 171 मध्ये वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज २६ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या सुमारास गडचिरोली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७१ मध्ये वनकर्मचारी गस्ती वर गेले असता बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरीक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्रसहायक श्रीकांत नवघरे, वनरक्षक राठोड, वनरक्षक भसारकर, वनरक्षक हेमके व वाघ सनियंत्रक पथक गडचिरोली व अधिनस्त संपूर्ण वनाधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. मृत बिबट्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. तसेच जवळच पट्टेदार वाघाचे पाऊलखुणा आढळून आले. तसेच जवळच पट्टेदार वाघ व बिबट यांच्यात झुंज झाल्याचे निशाण दिसून आले. बिबट्याचे शवविच्छेदन केले करून रासायनिक तपासणी करीता नमुने घेण्यात आले आहे. मृत बिबट्याच्या शरीरावरील जखमावरून पट्टेदार वाघाने हल्ला करून बिबट्यास ठार केल्याचा अंदाज डॉ . चेतन नंदनवार व डॉ. श्रेधेय सिरणकर यांनी व्यक्त केला आहे.
सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद सचिव मिलिंद उमरे व वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर तसेच ग्रामपंचायत वाकडी चे सरपंचा सौ. सरिता चौधरी व पोलीस पाटील देवेंद्र वाकडे हे सुद्धा उपस्थित होते. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून
मृत शरीरास अग्नी देऊन सर्वासमक्ष नष्ट करण्यात आले.
सदर घटनेमध्ये वाघ आणि बिबट यांची झुंज झाल्याने वाघ सुद्धा जखमी झालेला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला असून घटना स्थळाच्या आजूबाजूच्या जंगल परिसरात गावकऱ्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुद्धा या भागातील जंगलात नेऊ नये असे आवाहन सहायक वनसंरक्षक सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी केले आहे. सदर घटनेची चौकशी उप वनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here