– चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील व्यक्तींची तपासणी माहे ऑक्टोंबर 2021 पासून सुरु असून 12 मार्च 2022 पर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्ती विविध शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑक्टोबर महिन्यातच ब्रह्मपुरी येथे संबंधित आरोग्य विभागाला दिले होते. यांच्या संकल्पनेतून दिव्यांग व्यक्तीची आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्राचे वाटप, त्यांच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण तसेच नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे आदी बाबी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी सांगितले.
सदर तपासणी मोहीम 13 जानेवारी रोजी ब्रह्मपुरी, 14 जानेवारी रोजी सिंदेवाही तर 15 जानेवारी 2022 रोजी सावली या तीन तालुक्यातील रुग्णालयांमध्ये पार पडणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून या मोहिमेचा प्रचार व प्रसार वैद्यकीय यंत्रणेकडून करण्यात आला आहे. सकाळी 10 ते 1 या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी केले आहे.