The गडविश्व
चंद्रपूर : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण शक्तीसाठी ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत तांदूळ व धान्य आदी साहित्य शाळा स्तरावर वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या निर्देशानुसार तांदूळ हा भारतीय खाद्य महामंडळाकडून प्राप्त करून वखार महामंडळातून उचल करून वितरीत करण्यात येतो. तांदूळ दर्जाबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. मात्र, ते तांदूळ प्लास्टिकचे नसून जीवनसत्वयुक्त फोर्टिफाइड तांदूळ आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी दिली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत फोर्टिफाइड तांदुळ प्रथमच दिला जात असून सदर तांदूळ विद्यार्थ्यांना, पालकांना वितरित केल्या जात आहे. पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये काही प्रमाणात तांदूळ हा फोर्टिफाइड आहे. फक्त नियमित तांदळापेक्षा थोडासा पिवळसर आहे. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये सदर तांदूळ याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना फोर्टिफाइड तांदळात बद्दल अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
फोर्टिफाइड तांदळाबद्दलची माहिती :
पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण 1:100 आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आहे.
विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्याकरीता फोर्टिफाइड तांदूळ देण्यात येत आहे. या तांदळामध्ये आयरन, फोलिक आणि विटामिन बी-12 तसेच झिंक, विटामिन ए, विटामिन बी-1,बी-2, बी-5, बी-6 या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाइड तांदूळ बनविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाइड तांदळाचे वजन हे नियमित तांदूळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. या योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, यापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर, त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करून घेऊ नये.
फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजविण्यात यावा, याकरीता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपद्धती अवलंबण्याची आवश्यकता नाही. फोर्टिफाइड तांदळाबाबत अधिकची माहिती केंद्रशासनाच्या फूड सेफ्टी आणि स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसए) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, फोर्टिफाइड तांदुळाबाबत शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही, याबाबत नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.