जातीय व लैंगिक शोषणांवर कडाडून टिकाकर्ते !

302

क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल जयंती विशेष

राम प्रसाद बिस्मिल यांच्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी सांप्रदायिक सौहार्द होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात वारंवार हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. अशी आशा व्यक्त केली, की त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या त्यागाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकत्र येण्यास मदत होईल. त्यांच्या क्रांतिकारक राजकारणाची माहिती देणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ती जात आणि लिंगभाव संबंधांबद्दलची मते होत. त्यांच्या आजीने स्वतःच्या पुराण मतवादी पारंपारिक पितृसत्ताक मर्यादा तोडून नोकरीसाठी घराबाहेर पडल्या. त्यांच्या आईनेसुद्धा मुलींना शिक्षित करण्यासाठी बराच संघर्ष केला. या पार्श्वभूमीवर बिस्मिल यांनी जुन्या परंपरा कायम ठेवण्याच्या नावाखाली जाती व लिंगभाव आधारित होणार्‍या शोषणावर कडाडून टीका केली. त्यांचे “सरफरोशी की तमन्ना..” हे गीत जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे नाव काकोरी कटाच्या घटनेमुळे जनतेच्या मनावर कोरले गेले आहे. धाडसी ट्रेन-लूटीच्या या घटनेने उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळीने दिशा बदलली. तथापि उजव्या विचारसरणीने बिस्मिल यांचे पुरेपूर भगवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांचे काव्य हे देशप्रेम व मानव एकता उजागर करणाऱ्या ठरतात-
“मुहम्मद पर सब-कुछ कुर्बान, मौत के हों तो हों मेहमान!
कृष्णा की मुरली सुन तान चलो, हो सब मिलकर बलिदान!”
सद्या असंख्य स्वस्त चरित्रे आणि छोटी पुस्तके आहेत, जे त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाचे प्रतीक म्हणून सादर करतात. इतर सर्व क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा बिस्मिलने मोठ्या संख्येने पुस्तके आणि लेख लिहिले. असे असुनसुद्धा वास्तविकतेचा काहीही संबंध नसलेले बिस्मिलचे हिंदुत्वीकरण हे यशस्वी झाले आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या विचारधारेवर फारच कमी अभ्यास झाला आहे. उर्दू आणि हिंदी भाषेचे एक उत्तम कवी असलेल्या बिस्मिल यांचा जन्म दि.११ जून १८९७ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या निम्न- मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. बिस्मिलचे पूर्वज बुंदेलखंड प्रांतातील होते. हा प्रांत रूढीवादी समाज आणि बंडखोर वृत्तीच्या दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध होता. आजूबाजूच्या सामाजिक पुराण मतवादामुळे अस्वस्थ झालेले बिस्मिल हे अगदी लहान वयातच एक अतिशय श्रद्धाळू आर्यसमाजी बनले आणि त्यांचे गुरु स्वामी सोमदेव यांच्या प्रभावाखाली ब्रिटिश साम्राज्याविरोधी संघर्षात ओढले गेले. स्वामी सोमदेव यांनी बिस्मिल यांना इटालियन देशभक्त मॅझीनी आणि इतर साथींच्या लिखाणाची ओळख करून दिली. बिस्मिल यांनी सन १९१६च्या लखनौतील काँग्रेसच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि त्यांचा संपर्क मातृवेदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ब्रिटीशविरोधी भूमिगत क्रांतिकारक संघटनेशी झाला. जरी बिस्मिल यांच्या वैयक्तिक जीवनावर आर्य समाजाचा खोलवर प्रभाव होता, तरीही राजकारणात मात्र ते धर्मनिरपेक्ष झाले. सन १९२०च्या दशकाच्या सुरुवातीपासून संयुक्त प्रांतातील- आजचे उत्तर प्रदेशातील दोन भिन्न राजकीय धारांचे क्रांतिकारक उभे राहिले- एक म्हणजे हिंदू सांप्रदायिक संघटना आणि तुलनेने धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा स्वराज पक्ष. सन १९२५च्या नगरपालिका निवडणुकीत हिंदू सांप्रदायिकतेचा विजय झाल्यामुळे प्रांतात धार्मिक तणाव वाढला होता आणि त्यामुळे अनेक दंगली झाल्या. संवैधानिक पद्धतीने संघर्ष करण्याच्या पद्धतीवर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन टीका जरी करत असला तरी बिस्मिल यांनी शाहजहांपूर जिल्हा मंडळासाठी उमेदवारी अर्ज स्वराज पक्षाच्या वतीने दाखल केला. पुढे त्यांनी अशफाक उल्ला खान यांच्यासमवेत रोहिलखंड भागातील दंगलीग्रस्त भागात जातीय सलोख्याची मोहीम हाती घेतली. धार्मिक राजकारणाबद्दल त्यांचा तिरस्कार आणखीनच स्पष्ट होता, कारण त्यांनी म्हटले आहे की ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक हिंदु-मुस्लिम फूटीचा वापर भारतावरील त्यांचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी केला. सांप्रदायिक हिंसाचारात भाग घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचे त्यांनी समर्थन केले.
त्याच वर्षी बिस्मिल यांनी “अमेरिका को स्वाधीनता कैसे मिली?” हे पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांनी एखाद्या देशाला प्रगत होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य गरजेचे आहे व ते मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष सर्वात जास्त व्यवहार्य पर्याय आहे; अशी भूमिका मांडली. सन १९१८मध्ये त्याने “देशवासीयो के नाम संदेश’‘ हे पत्रक प्रकाशित केले, ज्यामध्ये ब्रिटीशांविरुद्ध सर्व जातीधर्मांच्या लोकांनी एकत्र होऊन लढावे असे आवाहन केले. ब्रिटिश सरकारने जवळपास सर्व मातृवेदी क्रांतिकारकांना अटक केली; पण बिस्मिल त्यातून निसटण्यात यशस्वी ठरले. सन १९२०मध्ये त्यांनी “सुशील माला” नावाने प्रकाशनगृह सुरू केले आणि बोल शेविकों की करतूत- रशियन क्रांतिकारक चळवळीवर आधारित कादंबरी प्रकाशित केली. तसेच मन की लहर कवितासंग्रह आणि कॅथरीन यात रशियन समाजवादी क्रांतिकारक, कॅथरीन ब्रेशकोव्हस्की यांचे चरित्र प्रसिद्ध केले. असहकार चळवळीच्या वेळी त्यांनी स्वदेशी रंग नावाचा कवितासंग्रह छापला. त्याकाळी बिस्मिल अज्ञात व इतर टोपण नावाने आज, वर्तमान, प्रभा इत्यादी नियतकालिके चालवायचे. असहकार चळवळीच्या अपयशानंतर क्रांतिकारक रशियाची समाजवादी क्रांती आणि गांधीवादी संघर्षात जागृत झालेल्या शेतकरी व तरूणांमुळे प्रेरित होऊन हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या नावाने पुन्हा संघटित झाले. त्यांनी दी रिवोल्यूशनरी नावाचे एक पत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी जाहीर केले, की माणसाकडून माणसाचे होणारे शोषण बंद होईपर्यंत त्यांचा संघर्ष चालूच राहील. दि.९ ऑगस्ट १९२५ रोजी बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी लखनौजवळ काकोरी येथे रेल्वे थांबवून सरकारी तिजोरी लुटली. यातून मिळालेला निधी जर्मनीकडून शस्त्रे घेण्यासाठी वापरण्यात येणार होता. त्यानंतर बहुतेक एचआरए नेत्यांना अटक करण्यात आली व त्यापैकी बिस्मिलसह चार जणांना सन १९२७मध्ये ब्रिटिशांनी फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी बिस्मिल यांनी कोठडीत त्यांचे आत्मचरित्र लिहिले जे तुरुंगातून तस्करी करुन बाहेर आणण्यात येऊन प्रताप प्रेसने ते प्रकाशित केले.
बिस्मिल यांच्या विचारसरणी बद्दलचे आकलन आणि दृष्टिकोन हे मुख्यतः शेवटच्या क्षणांत त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर आधारित आहे. अमेरिकन साहित्यिक समीक्षक जोसेफ टी.शिपले यांनी लिहिल्याप्रमाणे- अस्सल आत्मचरित्र ही लेखकाच्या आयुष्याचा प्रवास रेखाटताना एका विस्तृत पार्श्वभूमीवर आपल्या जीवनाचे महत्व काय होते, याबद्दल केलेल्या आत्मनिरीक्षणांवर भर देते. आत्मचरित्रांमध्ये असे अनुभव, निरीक्षणे आणि घटना असतात जे लेखकाचे आयुष्य घडविण्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावतात. आम्हाला विश्वास आहे, की बिस्मिलचे आत्मचरित्र हा त्यांच्या जीवनाचा आणि राजकीय प्रवासाचा सार आहे आणि म्हणूनच त्यांच्या वैचारिक कलाचे विश्लेषण करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते. बिस्मिल हे आर्यसमाजाचे सदस्य होते आणि त्यांनी संस्थेच्या शुद्धी- धर्मांतरण कार्यक्रमात भाग सुद्धा घेतला होता. त्यांच्या काळातील बर्‍याच लोकांप्रमाणे तीव्र धर्मांध वातावरणामुळे मुस्लिम समुदायाबद्दल त्यांच्या मनात खोलवर संशय होता. मात्र अशफाक उल्ला खानबरोबरच्या त्यांच्या मैत्रीमुळे त्यांचे विचार बदलले. आपल्या आत्म चरित्रातील अशफाक यांना समर्पित केलेल्या भागात बिस्मिल मुस्लिमांबद्दलच्या त्यांच्या सुरुवातीच्या संशयाबद्दल लिहितात. अशफाक उल्लांशी असलेल्या त्यांच्या मैत्रीबद्दल ते लिहितात- मला संशय होता की महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुस्लिम विद्यार्थ्याने माझ्याशी क्रांतिकारक कारवायांविषयी बोलण्याची इच्छा का दर्शविली, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिरस्काराने दिली… मुस्लिम असल्याने माझ्या काही मित्रांनी तुम्हाला नापसंत केले होते… परंतु ब्रिटिशविरोधी कारवाया आणि अशफाकशी मैत्री जसजशी वाढत गेली तसतशी त्यांनी धार्मिक पक्षपातीपणा सोडून सर्वधर्मसमभावाच्या सिद्धांतावर धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल केली. त्यांनी या परिवर्तनाबद्दल लिहिले आहे- तुझ्या मैत्रीने… मला खात्री झाली आहे, की हिंदू आणि मुस्लिम यात काही फरक नाही. त्यांच्या कवितेच्या दोन ओळी-
“हिंदु और मुसलमान मिल कर जो चाहें सो कर सकते हैं।
ए चरखा-कुहन होसियार हो तू, पुरज़ोश हमारे नाले है।”
साम्राज्य वादविरोधी संघर्षाच्या इतिहासात सांप्रदायिकतेचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. सन १९२०च्या दशकात वाढणारे हिंदू-मुस्लिम तणाव आणि सततची दंगल या प्रश्नाला क्रांतिकारक चळवळीलाही सामोरे जावे लागले. सीएएविरोधात झालेल्या निषेधादरम्यान रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांचे मित्र व कॉम्रेड अशफाक उल्ला खान हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व उत्तर भारतातील संमिश्र संस्कृतीचे प्रतिनिधी- गंगा-जमुना तहजीब म्हणून साजरे केले गेले. दि.१९ डिसेंबर १९२७ रोजी काकोरी कटातील नेते अशफाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि रोशन सिंह यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.

!! गडविश्व न्युज नेटवर्क परिवारातर्फे पावन जयंती निमित्त या महान क्रांतिकारी साहित्यिकास विनम्र अभिवादन !!

– संकलन व शब्दांकन –
श्री के. जी. निकोडे- ‘केजीएन’
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.
ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
मो. नं. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here