गडचिरोली जिल्हा न्यायालयात उद्देशिकेच्या गोंडी भाषेतील प्रतिमेचे अनावरण

1383

-स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सोहळा २०२२ :
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि अभिनव पद्धतीने साजरा झाला. सर्वप्रथम जिल्हा न्यायालयाचे प्रांगणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचे हस्ते सर्व मान्यवरांचे उपस्थित ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.
भारतीय राज्यघटना ही केवळ उच्चशिक्षीत लोकांसाठी तयार केलेली पुस्तीका नसून ती तमाम भारतीय जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतीक असून तिचे ज्ञान सर्वव्यापी होण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी अपेक्षा नुकतीच भारताचे सर न्यायाधीश रमणा यांनी व्यक्त केली होती. त्या अपेक्षा व आवाहनाला सुयोग्य प्रतिसाद म्हणून संविधानाच्या मराठी भाषेतील उद्देशिकेच्या प्रतिमेचे स्थापन व अनावरण गडचिरोली न्यायालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागात करण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी निश्चित केले आणि त्यास त्या सुवर्णदिनी मुर्त रुप दिले.
गडचिरोलीची बहुभाषीक बोली ही गोंडी भाषा आहे. तशी उद्देशिका जर गोंडी भाषेतही सर्वांसमोर मांडता आली तर तिचे महत्व सर्वदूर पोहोचेल आणि तमाम जनतेला आपल्या न्याय्य हक्क व कर्तव्याची जाणीव होईल या भावनेतूनच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी उद्देशिकेच्या गोंडी भाषेतील प्रतिमांचे स्थापन आणि अनावरण करण्याचे ठरवून तो मनोदय पूर्ण केला. तसेच राज्यघटनेच्या कलम २९ मधील स्थानिक भाषा, लिपी व संस्कृती यांचे संवर्धन व्हावे हे उद्दीष्ट साध्य व्हावे हा देखील या कल्पनेमागचा हेतू होता. या सर्व प्रयत्नासाठी त्यांना भारताचे सरन्यायाधीश रमणा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती श्रीराम मोडक यांची प्रेरणा आणि उर्जा मिळाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले. या अभिनव व स्तुत्य प्रयोगाचे सर्वदूर कौतूक होत आहे. मराठी तसेच गोंडी भाषेतील उद्देशिकेच्या प्रतिमेचे अनावरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांचे शुभहस्ते आभासी पध्दतीने पार पाडले. ज्या न्याय मंदीरात लोकांच्या वादविवादाचे कायदेशिर निराकरण केले जाते, लोकांना न्याय दिला जातो अशा न्याय मंदीरात मराठी व गोंडी भाषेतील उद्देशिकांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करणे ही बाब गडचिरोली न्यायालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्यासारखी आहे, असे कौतूकाचे उद्गार न्यायमूर्ती मोडक यांनी या प्रसंगी काढले.
स्वातंत्र मिळविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी केली पण स्वांतत्र्याची ज्योत आपल्या मनामध्ये सदैव तेवत ठेवली त्या सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यविरांच्या प्रवित्र स्मृतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश उदय शुक्ल यांनी वंदन केले आणि ती ज्योत सदैव जागृत ठेवण्याचे एक प्रतिक म्हणून आपण मराठी व गोंडी भाषेतील संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमांचे स्थापन व अनावरण करत असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले. अशा प्रतिमांचे स्थापन व अनावरण करण्याची प्रेरणा व उर्जा भारताचे सरन्यायाधीश रमणा आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांचे कडून मिळाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमास नितेश लोडल्लीवार, सचिव, जिल्हा अधिवक्ता संघ, गडचिरोली तसेच वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती. तसेच तालुका न्यायालयातील न्यायाधीश व कर्मचारीवृंद आभासी पद्धतीने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथील शिक्षकवृंद – श्रीमती कविता खोब्रागडे, श्रीमती प्रिया साळवे आणि अनिल खेकारे तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी मराठी व गोंडी भाषेतील उद्देशिकेचे वाचन केले. वासुदेव कोडापे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली यांनी मराठीतील उद्देशिकेचे गोंडी भाषेत भाषांतर केले. गोंडी संस्कृतीदर्शक चित्रण मनोज गंगवाणी यांनी काढून इमारतीच्या सांस्कृतीक सौंदर्यात भर घातली. सदरच्या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली उदय शुक्ल यांनी केले तर सुत्र संचालन सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती सोरते यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार गडचिरोली येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम मु. मुधोळकर यांनी मानले.
सदरचा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एम.आर. वाशिमकर, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली, आर.आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, सी.पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे., गडचिरोली, आर.आर. खामतकर, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे., गडचिरोली तसेच गडचिरोली न्यायालयातील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here