ऑलिंपिक स्पर्धा आणि महिला सहभाग !

257

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन विशेष

दि.२३ जून १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस २३ जून १९४८ला साजरा करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये विजय मिळवणं नाही, तर सहभाग घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे, आयुष्यात जिंकणं नाही, तर लढणं सर्वांत महत्त्वाचं आहे. कसं? याविषयीचा उहापोह श्री एन. के. कुमार यांच्या या लेखातून वाचा.

आधुनिक ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांच्या त्या विधानात खेळांचेच नाही, तर जगण्याचे सूत्रही सामावले आहे. कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतूनच दि.२३ जून १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती- आइओसीची स्थापना झाली होती. त्यामुळेच २३ जून हा दिवस दरवर्षी ऑलिंपिक डे म्हणून साजरा केला जातो. ऑलिंपिक ही केवळ एक क्रीडास्पर्धा नाही, तर खेळाचा प्रसार करणारी आणि त्यातून लोकांना एकत्र आणणारी एक मोठी विश्वव्यापी चळवळ आहे. ऑलिंपिक चळवळीचे हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वर्षातला एक दिवस ऑलिंपिक दिवस म्हणून साजरा केला जावा, असा प्रस्ताव पहिल्यांदा सन १९४७ साली मांडण्यात आला होता. अनेक आजी माजी ऑलिंपियन खेळाडूंनी या काळात लोकांना प्रेरणा दिली आहे, खेळाने लोकांच्या जगण्यात सकारात्मकता आणली आहे आणि शारिरीक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठीही मदत केली आहे, असे विश्व ऑलिंपिक समितीने नमूद केले होते. जगाला एकत्र आणणाऱ्या सोहळ्याची ही सुरुवात होती. ऑलिंपिक समितीची स्थापना सव्वाशे वर्षांपूर्वी झाली होती, परंतु त्याचा इतिहास बराच जुना आहे. प्राचीन ग्रीसमध्ये इसवीसनपूर्व आठव्या शतकात म्हणजे सुमारे दोन हजार सातशे वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. सुमारे पन्नास हजार जण त्या खेळांसाठी हजेरी लावायचे, असे उल्लेख इतिहासात आहेत. ग्रीक संस्कृतीत खेळांना व खेळाच्या स्पर्धांना महत्त्वाचे स्थान होते आणि दर चार वर्षांनी होणारा ऑलिंपिक हा सर्वात मोठा सोहळा होता, अगदी आजच्यासारखाच! परंतु ग्रीकांसाठी हाच एक धार्मिक उत्सवही होता. ग्रीक संस्कृतीत झ्यूस हा देवांचा राजा मानला जायचा. त्याच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया येथे या खेळांचे आयोजन केले जायचे. येथेच झ्यूसचे मंदिर होते आणि त्यात त्याची सोने आणि हस्तिदंताने मढवलेली मूर्ती होती. तेथे धार्मिक विधीही होत असत, प्राण्यांचा बळी देण्याचीही प्रथा होती. काहीसे आपल्याकडच्या यात्रांमधल्या कुस्ती, कबड्डीच्या स्पर्धांसारखेच म्हणा ना! फरक इतकाच की त्या काळी विजेत्यांना पदक किंवा पैसे नाही, तर ऑलिव्हच्या फांदीपासून तयार केलेला मुकुट दिला जायचा आणि ते त्यांच्या गावी परतल्यावर मोठा मानसन्मान मिळायचा. खेळाडू आपल्या नगरराज्याची शान राखण्यासाठी खेळायला उतरायचे.

जागतिक ऑलिंपिक समितीतील झेकोस्लोवाकियाचे प्रतिनिधी डॉक्टर ग्रुस यांनी मांडलेली ही संकल्पना सर्वांनीच पुढे उचलून धरली आणि काही महिन्यांनी तिला मूर्त रूपही मिळाले. तेव्हापासून या दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या एखाद्या सोयीस्कर दिवशी वेगवेगळ्या देशांतल्या राष्ट्रीय ऑलिंपिक समितींतर्फे त्या त्या देशात ऑलिंपिक दिनाचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. वय, वर्ण, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी काहीही असो, सगळ्यांनाच म्हणजे अगदी अजिबात कोणताही खेळ न खेळणाऱ्या व्यक्तींनाही यात सहभाग घेता यावा, ही अपेक्षा ठेवली जाते. काही देशांत तर ऑलिंपिक डे हा शाळेतील महत्त्वाचा सोहळा बनला आहे. एकीकडे कोव्हिड-१९च्या जागतिक साथीने सगळीकडे निराशेचे सावट पसरलेले असताना तर ऑलिंपिक दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. एकमेकांत गुंफलेल्या पाच रिंगा हे ऑलिंपिकचे बोधचिन्ह आहे. याला ऑलिंपिक रिंग्स म्हटले जाते. जगभरातल्या अब्जावधी लोकांचे प्रतिनिधीत्व या रिंगा करतात. ऑलिंपिकचे जनक मानले जाणाऱ्या पिएर द कुबेर्तान यांनी पहिल्यांदा हा लोगो तयार केला. पाच खंडांचे द्योतक असणाऱ्या या रिंगा विविध रंगांच्या, पण समान आकाराच्या आणि एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. जगभरातील लोकांचे एकत्र येणे यावरून दर्शित होते. पांढऱ्या पार्श्वभूमीवरील या रिंगा निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल अशा रंगात असतात. दोराबजी टाटांनी भारतीय खेळाडूंना स्वतःच्या पैशाने ऑलिम्पिकला पाठवले होते. याचे कारण असे, की म्युनिक ऑलिम्पिकमधली ती रक्तरंजित रात्र, जेव्हा अकरा इस्रायली खेळाडूंची हत्या झाली होती… एरवी या नगरराज्यांमध्ये युद्धं, लढाया, भांडणं व्हायची. पण ऑलिंपिकच्या काळात पवित्र युद्धबंदी लागू केली जात होती. खेळाडू आणि प्रेक्षक ऑलिम्पियाला जाऊन सुखरूपपणे परत येऊ शकतील, यासाठी ही युद्धबंदी व्हायची. ऑलिंपिक स्पर्धा हे तेव्हापासूनच शांतीचे प्रतीक मानले जाते. पूर्वी ऑलिम्पियातील हे खेळ पाहण्यासाठी फक्त पुरुष, लहान मुलं आणि अविवाहित मुलींनाच परवानगी होती, लग्न झालेल्या स्त्रियांना तिथे जाण्यास मज्जाव होता. नियम मोडणाऱ्यांना कडेलोट करण्याची शिक्षा होत असे. पण महिला आपल्या मालकीचे घोडे या ऑलिंपिकमध्ये रथांच्या स्पर्धेत उतरवू शकत होत्या. तसेच दर चार वर्षांनी झ्यूसची पत्नी हेराच्या सन्मानार्थ केवळ अविवाहीत महिलांच्या खेळाचे आयोजन केले जायचे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव ओसरत गेला, तसे हे खेळ मागे पडत गेले आणि काहींना त्यांचा साफ विसर पडला होता.

आधुनिक ऑलिंपिकचे जनक फ्रेंच जहागीरदार पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिम्पिकच्या आयोजनाचे श्रेय दिले जाते. परंतु त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली होती, ती इंग्लंडमधील वेनलॉक ऑलिंपिक गेम्समधून. मच वेनलॉक गावी जन्मलेले डॉ.विल्यम पेनी ब्रुक्स यांनी आपल्या परिसरातील तरुणांना शिस्त लागावी, त्यांची तब्येत सुधारावी अशा उद्देशाने सन १८५० साली वेनलॉक ऑलिंपिक गेम्सची सुरुवात केली होती. या वेनलॉक क्रीडास्पर्धांमधूनच पिएर द कुबेर्तान यांना आधुनिक ऑलिंपिक खेळांच्या आयोजनाची प्रेरणा मिळाली होती. कुबेर्तान हे शिक्षणतज्ज्ञ होते, ते श्रीमंतही होते. ते इंग्लंडमधील शाळांच्या कामाच्या पद्धतीवर संशोधन करण्यासाठी गेले असताना त्यांना तेथे- खेळावर कसा भर दिला जातो? खेळातून मूल्यशिक्षण देता येते का? आणि समाजाविषयी जागरुकता कशी निर्माण करता येते? याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यांचे फ्रान्समधल्या शाळांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न तेवढे यशस्वी झाले नाहीत. मात्र त्या सगळ्यांतून त्यांना प्राचीन ऑलिंपिकचे पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कल्पनेतल्या या ऑलिम्पिकमध्ये देशविदेशातले खेळाडू सहभागी होणार होते आणि आपापसातील वैर विसरून खेळाच्या मैदानात उतरणार होते. कुबेर्तान यांच्या प्रयत्नांतून फ्रान्समध्ये सन १८९४ साली २३ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना झाली. दोनच वर्षांत ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एप्रिल १८९६मध्ये अथेन्सच्या पॅनाथेनिक स्टेडियममध्ये पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्रेचाळीस क्रीडाप्रकारांमध्ये फक्त चौदा देशांचे जेमतेम दोनशे पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. त्यात टेनिस, ट्रॅक अँड फिल्ड, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, कुस्ती, नेमबाजी, जलतरण आणि जिमनॅस्टिक्स यांचा समावेश होता. क्रिकेट आणि फुटबॉललाही त्या स्पर्धेत स्थान मिळाले होते, परंतु पुरेशा खेळाडूंअभावी ते रद्द करावे लागले होते. चार वर्षांनी दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये काही खेळांत पहिल्यांदाच महिलांना स्थान मिळाले. त्यानतंर पुढच्या सव्वाशे वर्षांत या क्रीडास्पर्धेने बरेच चढउतार पाहिले आहेत. लोकांना खेळावर प्रेम करायला शिकवले आहे आणि त्यांना संकटकाळात प्रेरणा पण दिली आहे. ऑलिंपिक दर चार वर्षांनी का होते? तर प्राचीन काळी ग्रीसमधील ऑलिम्पिया नगरीमध्ये दर चार वर्षांनी खेळ म्हणजेच ऑलिंपिक होत असे. म्हणून हीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली. दोन ऑलिंपिकदरम्यानच्या चार वर्षांच्या काळाला ऑलिम्पियाड म्हटलं जाई आणि हे त्याकाळी कालगणनेचे मापही होते. म्हणजे वर्षांऐवजी ऑलिम्पियाडमध्ये कालगणना केली जाई.

सन १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये महिला पहिल्यांदा सहभागी झाल्या. हे दुसरेच ऑलिंपिक होते. त्यात सहभागी झालेल्या ९९७ ॲथलीट्सपैकी २२ महिला होत्या. टेनिस, सेलिंग, क्रोके, इक्वेस्ट्रियानिझम- घोडेस्वारीशी निगडीत स्पर्धा आणि गोल्फ या खेळ प्रकारांत महिला ॲथलीट्स सहभागी झाल्या. सन २०१२मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचाही समावेश झाला, तेव्हापासून ऑलिंपिकच्या सर्व क्रीडा प्रकारांत महिलांचा समावेश झाला. सन १९९१पासून यांत नवीन खेळाचा समावेश करण्यासाठी एक नियम करण्यात आला. महिला आणि पुरुष अशा दोन्ही ॲथलीट्सचा सहभाग ज्या खेळात असेल, तोच ऑलिंपिकमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. यानंतर टोकियो २०२० ऑलिंपिकमध्ये कराटे, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, क्लाईंबिंग या खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलाय. सन २०१६च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी ४५ टक्के महिला होत्या, हे येथे उल्लेखनीयच !
!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे विश्व ऑलिंपिक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

– संकलक –
श्री. एन. के. कुमार, से.नि.अध्यापक.
(वैभवशाली भारताचा प्रेरणादायी इतिहास अभ्यासक)
गडचिरोली, व्हा.नं. ७४१४९८३३३९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here