– शिक्षक वाढ करून देण्याची खासदार नेते यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २० ऑगस्ट : तालुक्यातील अतिसंवेदन क्षेत्रात येणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील मुरूमगाव परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसमी येथील ९३ विद्यार्थ्यांचा भार ३ शिक्षकांवर असल्याने अपुरे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे या शाळेत शिक्षकाची वाढ करून देण्यात यावी अशी मागणी खासदार नेते यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
कोसमी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत १ ते ८ वी पर्यंत वर्ग आहे. १ ते ५ ला ५६ विद्यार्थी आणि ६ ते ८ ला ३७ असे एकूण ९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र एवढे विद्यार्थी असतांना येथे केवळ २ शिक्षक होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अपुरे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत होते. दरम्यान शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यासंदर्भात ३० जून २०२३ ला पंचायत समिती धानोरा येथे निवेदन दिल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोसमी शाळेवर १ शिक्षक पाठविले. आता एकूण शिक्षकांची संख्या ३ झालेली आहे. यापैकी एका शिक्षकाला मुख्याध्यापकाचे कारभार सांभाळावे लागते. परंतु या परिस्थितीतही विद्यार्थ्यांना जसे शिक्षण पाहिजे तसे शिक्षण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याच प्रकारे होऊ नये यासाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. लताताई पुंगाटे यांच्या नेतृत्वात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. इयत्ता ६ ते ८ या वर्गाकरिता इंग्रजी, मराठी, विज्ञान या विषयाचे शिक्षक पाठविण्यात यावे, त्याचप्रमाणे येथिल शिक्षक गद्देवार हे कोसमी शाळेचे शिक्षक असून त्यांना मोहली मॉडेल स्कूल येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. त्यांना परत बोलावून कोसमी शाळेत पाठवण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देऊन कोसमी शाळेच्या मागण्यांचा विचार करून समस्येचे निराकरण २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात यावे अन्यथा २९ ऑगस्ट पासून आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. परिणामी शाळा बंद पडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे कोसमी येथील ग्रामवासी तथा शाळा व्यवस्थापन समिती कोसमी चे पदाधिकारी यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना जिल्हा परिषद माजी सदस्या सौ.लताताई पुंगाटे, विजय मारगोनवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश शाहू, वैशाली नैताम, रवींद्र मडावी, हर्षवर्धन कार, गणेश दुर्वे, जय लाल दुर्वे, गजेंद्र नाईक व गावकरी उपस्थित होते.
