होय..बांधकाम कामगारांनासुद्धा शासनाच्या विविध योजना : जाणून घ्या काय आहे त्या योजना

980

-“शासन आपल्या दारी” उपक्रमातून नोंदणी करण्यासाठी व योजनांच्या लाभासाठी संधी
The गडविश्व
गडचिरोली, १८ मे : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सद्या गावोगावी शिबीरांचे आयोजन करून योजनांचा लाभ शासन सर्वसामान्यासाठी देत आहे. नागरिकांमधील विविध क्षेत्रांमधे काम करणाऱ्या गटामधे बांधकाम कामगार हा घटक महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात अशा कामगारांना लागू असलेल्या योजनांचा लाभ अगदी सहज घेता येणार आहे. कामगाराच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थिक सहाय्य यात इयत्ता पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अर्थिक मदत मिळते. तसेच कामगाराच्या पत्नीस किंवा स्वत: महिला कामगारास प्रसुतीसाठी अर्थिक सहाय्य, आरोग्य विमा, एकच मुलगी असल्यास एक लाखाची मुदतठेव, कामगाराच्या मृत्यू पश्चात अर्थिक मदत, घर खरेदी कर्जावरील योजना, विवाह अर्थ सहाय्य अशा अनेक योजना नोंदीत कामगारांसाठी आहेत. बांधकाम कामगार नोंदणीसाठी मागील ९० दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक व दोन फोटो लागतात. त्यानंतर बांधकाम कामगार म्हणून नोंद होते. कामगार नोंद ऑनलाईनही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर केली जाते. नोंद झाल्यानंतर मिळणाऱ्या योजना आपण सविस्तर पाहू.
शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना : नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना शाळेतील ७५% उपस्थिती असणाऱ्या इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु. २५००/- आणि इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु. ५०००/- एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य आहे. यासाठी ७५% हजेरीबाबत शाळेचा दाखला किंवा हजेरीपत्रक, बोनाफाईड दाखला (मुळ प्रत), पाल्याचे नाव नमूद असलेले राशन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र इत्यादी आवश्यक आहे. नोंदीत लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना इयत्ता १) वी व इयत्ता १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/- एवढे प्रोत्साहानात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका, शाळेत शिक्षण घेत असल्याचा पुरावा बोनाफाईड दाखला (मुळ प्रत), शाळेचे महाविदयालयाचे ओळखपत्र, पाल्याचे नाव नमूद असलेले राशन कार्ड, पाल्याचे मूळ आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र या कागदपत्रांची यासाठी आवश्यकता आहे. कामगाराच्या २ पाल्यांना इयत्ता ११ वी व इयत्ता 12 वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/- एवढे शैक्षणिक सहाय्य मिळते. १० वी व ११ वी ची गुणपत्रिका, बोनाफाईड दाखला, शाळेचे ओळखपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते.
नोंदित लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना अथवा पुरूष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु २०,०००/- एवढे शैक्षणिक सहाय्य आहे. मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका/प्रमाणपत्र, बोनाफाईड दाखला (मूळ प्रत), महाविद्यालयाचे ओळखपत्र, राशन कार्ड, धार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र सादर केल्यानंतर सहाय्य मिळते. कामगाराच्या २ पाल्यांना अथवा पुरूष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इ.साठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता रू.१,००,०००/- व अभियंत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता रू.६०,०००/- इतके शैक्षणिक सहाय्य आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका, प्रमाणपत्र, बोनाफाईड दाखला, ओळखपत्र, राशन कार्ड, धार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते. नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना, शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी रू.२०,००० आणि पदव्युत्तर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रति शैक्षणिक वर्षी रु. २५,०००/- एवढे शैक्षणिक सहाय्य मिळते. संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना शुल्काची परीपुर्ती. तथापि, MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात यावी. यासाठी MS-CIT कोर्स प्रमाणपत्र व शुल्काची पावती, राशन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते.

आरोग्य सहाय्य योजना : नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी रु.१५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी रु. २०,०००/- एवढे आर्थिक सहाय्य आहे. सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेले नैसर्गिक / शस्त्रक्रियेव्दारे प्रसूतीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके / प्रसूती घरी झालेली असल्यास , ग्रामसेवक, ग्रामपंचायत, नगर पालिका, महानगर पालिका जन्म नोंदणी प्रमाणपत्र, अपत्याचे नाव असलेले राशन कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र व डिस्चार्ज सारांश इ.कागदपत्र जोडावी लागतात. लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु.१,००,०००/- एवढे वैद्यकीय सहाय्य आहे. एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यत मर्यादित तथापि, आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ मिळतो. जिल्हा शल्यचिकित्सक अधिका-यांनी आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र, वैद्यकीय खर्चाची पावती, निवडलेल्या कुटुंब सदस्याचे आधार कार्ड कागदपत्र, अर्जदाराचे स्वघोषणापत्र सादर करावे लागते. नोंदीत लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती/ पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रू.१,००,०००/- मुदत बंद ठेव योजना आहे. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे दिलेले कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र, अर्जदारास एक कन्या अपत्य असल्याचे शपथपत्र, मुलीचे आधारकार्ड, सर्व सत्यप्रतीवर स्वत:साक्षांकित करून सादर करणे.
कामगारास ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रु.२,००,०००/- एवढे आर्थिक सहाय्य मिळते. तथापि, नोंदीत बांधकाम कामागाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत रू.२,००,०००/- आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय आहे. यासाठी कामगारास ७५% किंवा अधिक अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे/ वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र व अर्जदाराचे स्वघोषणापत्र सादर करावे लागते. तसेच महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनाही लागू आहे,या योजनेकरीता विहीत शिधापत्रिका सादर करावी लागते. व्यसनमुक्ती केंद्राअर्तंगत उपचाराकरीता नोंदित बांधकाम कामगारास रु. ६०००/- इतके अर्थसहाय्य आहे. लागणारी आवश्यक कागदपत्र यात शासकीय/निमशासकीय व्यवनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैधकीय अधिकारऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

आर्थिक सहाय्य योजना : नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रु. ५,००,०००/- एवढे आर्थिक सहाय्य आहे. यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा-पंचनामा व प्राथमिक चौकशी अहवाल (FIR), वारसाची पासबुक खाते प्रत, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र, नामनिर्देशित व्यक्ती उपलब्ध नसल्यास वारस प्रमाणपत्र, पंचनामा लागेल. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२ लाख आर्थिक सहाय्य आहे.
कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधणीकरीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रु. ६,००,०००/- पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रु.२,००,०००/- पर्यंत आर्थीक सहाय्य. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यात राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा, पती आणि पत्नीच्या नावावर घर नोंदविल्याचा पुरावा, पती किंवा पत्नीच्या नावे घर नसल्याचे शपथपत्र नाव, राष्ट्रीयकृत बँकेकडून ६ लाख रुपयांचे व्याज देय प्रमाणपत्र, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते. प्रधानमंत्री आवास योजनेत नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना मंडळामार्फत रु. २ लक्ष अनुदानही मिळते. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित प्रत, बांधकाम कामगार यांच्या स्वत:च्या अथवा पती/पत्नीच्या नावे घर नसल्याचे हमीपत्र, सर्व सत्यप्रतीवर स्वत:साक्षांकित करून सादर करणे. नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास रु. १०,०००/- एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत मिळते. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, अर्जदाराच्या बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत, अर्जदाराच्या व्यक्तीचे आधार कार्ड, नामनिर्देशित व्यक्ती उपलब्ध नसल्यास वारस प्रमाणपत्र, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते. नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतीवर्षी रु. २४,०००/- एवढे आर्थिक सहाय्य मिळते. यासाठी सक्षम/वैद्यकीय अधिका-यांनी दिलेला मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्राची प्रत(Optional), अर्जदाराच्या बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत, अर्जदाराच्या व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे स्वघोषणापत्र लागते.

सामाजिक सहाय्य योजना : नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी रु. ३०,०००/- अर्थसहाय्य आहे. यासाठी विवाह नोंद प्रमाणपत्र, अर्जदाराचे स्वघोषणापत्र, प्रथम विवाह असल्याचेबाबतचे प्रतिज्ञापत्र, पती/पत्नी चे आधार कार्ड लागते. तसेच व्यक्तीमत्व पुस्तक संचाचे वाटप ही होते. प्रधानमंत्री जिवण ज्योती विमा योजना मिळते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व कौशल्य वृध्दीकरण योजना मिळते. अत्यावश्यक संच व सुरक्षा संचही पुरविला जातो. त्यासाठी विहीत नमूण्यातील मागणी पत्र आवश्यक आहे.
बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता रू ५१,०००/- अर्थसहाय्य आहे यासाठी मुलीचा विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, लग्न झालेल्या मुलीचे वय १८ वर्षे पेक्षा कमी असू नये याबाबत वयाचा पुरावा सादर करावे. अपघाती/ नैसर्गिक मृत्यू झालेल्या नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्याचे शव शववाहिनीद्वारे मुळ गावी पाटविण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या आगार प्रमुखाने प्रति किलोमीटर अंतरासाठी प्रमाणित केलेल्या दराप्रमाणे अर्थसहाय्य मिळते. नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थांचा अपघातात हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रिम अंग जोडण्यासाठी अर्थसहाय्य मिळते.
तेव्हा सरकारी कामगार अधिकारी, तथा उपजिल्हा कार्यकारी अधिकारी गडचिरोली. कॅनेरा बैंकेच्या समोर चामोर्शी रोड गडचिरोली, या कार्यालयाकडे अधिक माहितीसाठी संपर्क साधा असे आवाहन सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here