कुरखेड्यात लाखोंचा ‘वॉटर एटीएम’ दोन वर्षांपासून ठप्प ; स्वच्छ पाण्यासाठी नागरिकांची प्रतीक्षा कायम
– उद्घाटनाविनाच रखडला प्रकल्प, कंत्राटदाराचे देयक प्रलंबित असल्याची चर्चा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २३ : कुरखेडा शहरातील हनुमान मंदिर परिसरात नगर पंचायतच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला ‘वॉटर एटीएम’ प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरवासीयांना अल्प दरात स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वॉटर एटीएमची संपूर्ण यंत्रणा उभारून तयार असूनही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली सुविधा दोन वर्षांपासून धूळ खात पडली असून, नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
दरम्यान, कंत्राटदाराचे कामाचे संपूर्ण देयक अद्याप अदा झाले नसल्याने संबंधित यंत्रणा नगर पंचायतकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आलेली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या चर्चेबाबत नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रखडलेल्या प्रकल्पाबाबत जाब विचारला. कंत्राटदाराचे देयक प्रलंबित असल्यास नियमानुसार त्याचा तातडीने निपटारा करून वॉटर एटीएम नागरिकांच्या सेवेत सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
कुरखेडा शहरातील नागरिकांना कमी दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तो सुरू न झाल्याने सार्वजनिक निधीचा उद्देशच अपूर्ण राहिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आता नगर पंचायत प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करून उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि लाखो रुपये खर्चून उभारलेला वॉटर एटीएम लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













