दारूबंदीचे समर्थन करणार्‍या उमेदवारालाच मत देणार

146

– २४९ गावांमध्ये ठराव, १२७६७ जणांनी केली स्वाक्षरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : विधानसभा निवडणूक दारूमुक्त निवडणूक व्हावी, यासाठी गावा-गावात असलेल्या जिल्हाभरातील दारूबंदी मुक्तिपथ गावसंघटना, शक्तीपथ संघटना, वॉर्ड संघटना यांच्या माध्यमातून ठराव घेण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण २४९ गावांतून १२७६७ मतदारांनी स्वाक्षरी करीत दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार, असा ठराव घेण्यात आला आहे.
मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत २४९ गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेण्यात आले आहे. पूर्ण शुद्धीत राहून सर्वांनी मतदान केले पाहिजे, योग्य उमेदवार निवडला पाहिजे. दारूबंदीचे समर्थन करणारा उमेदवार असल्यास गावाची किंबहुना जिल्हयाची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात दारू नसेल तर भांडणे शक्यतो होत नाही, शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. ३१ वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात असलेली दारूबंदी कायम स्वरूपी टिकून राहिली पाहिजे. यासाठी निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणार्‍या उमेदवाराने आम्हाला द्यावे लागेल. वचन न देणार्‍या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पुर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप करू नये. निवडणूक शांततेत पार पाडावी, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. इत्यादि विविध मुद्दे चर्चा करून ठरावात घेण्यात आले. यानुसार दारूबंदीचे समर्थन करणार्‍या उमेदवारांलाच आम्ही मत देणार असा ठराव २४९ गावातील १२७६७ मतदारांनी घेतला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here