घरासमोर खेळत असताना वाघाची झडप ; ६ वर्षीय बालक ठार
– परिसरात खळबळ
The गडविश्व
गोंदिया, दि. ११ : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने झडप घालत त्याला ठार केले. ही घटना शुक्रवार (१० एप्रिल) रोजी रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे. तो घराजवळ खेळत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. क्षणार्धात वाघाने त्याला जबड्यात पकडून जंगलाच्या दिशेने फरफटत नेले.
घटनेनंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी आरडाओरड करत तात्काळ पाठलाग केला. गावकऱ्यांच्या आवाजाने वाघाने काही अंतरावरून पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर प्रज्वल घरापासून काही अंतरावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून वनविभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gondia #TigerAttack #WildlifeConflict #HumanWildlifeConflict #BreakingNews #MaharashtraNews #TragicIncident #ForestDepartment #VillageNews #IndiaNews #StayAlert #GroundReport #LocalNews #WildlifeAttack














