मुनघाटे महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर प्रेरणादायी व्याख्यानमाला
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ११ : धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोलीद्वारे संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ निमित्त आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून “महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पंढरी वाघ उपस्थित होते. तसेच डॉ. दामोधर झाडे, रासेयो विभाग प्रमुख डॉ. प्रियंका पठाडे आणि अध्यक्षस्थानी डॉ. राजू किरमीरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक डॉ. वाघ यांनी फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व स्त्री-शिक्षणातील क्रांतिकारी कार्याचा सखोल उहापोह करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. किरमीरे यांनी फुले यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विणा जांभेवार, डॉ. गणेश चुदरी, डॉ. पंकज चव्हाण, डॉ. हरीष लांजेवार, प्रा. मानतेश तोंडरे, प्रा. ज्ञानेश बनसोड, डॉ. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. प्रशांत वाळके, डॉ. सचिन धवनकर, राकेश बोंगीरवार व मनोज नन्नावरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी रासेयो स्वयंसेवकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रियंका पठाडे यांनी केले. संचालन गौरव सोनुले यांनी तर आभार कु. यामिनी सोनुले यांनी व्यक्त केले.














