– परिसरात भीतीचे वातावरण
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतना गहाणे ), दि. ०७ : तालुका परिसरात वाघिणीची दहशत कायम असून तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या धमदीटोला येथे गाईच्या वासराची शिकार केल्याची घटना ७ मार्च रोजी उघडकीस आली आहे. सदर घटनेने कुरखेडा परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या धमदीटोला येथील एका शेतकऱ्याने घरासमोर आपले गुरे बांधून ठेवले असता रात्रोच्या सुमारास वाघाने वासरावर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. सदर घटना सकाळच्या सुमारास उघडकीस येताच घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. दरम्यान या घटनेने परिसरात दहशत पसरली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा व शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा,गुरनोली परीसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेकांना वाघाचे दर्शन झाले असून शेतशिवारातही वाघाने प्रवेश केल्याचे आढळून आले. परिसरात मका पिकाचे शेती असल्याने वाघ मका पिकांचा आधार घेत पिकांमध्ये लपून राहत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. तर आता चिखली- धमदीटोला – वडेगाव परिसरात वाघाचे दर्शन होऊन वासराला शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिक वाघाच्या दहशतीत आहे. वाघाच्या दहशतीने शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे सुरु असून मागील काही दिवसांपासून गेवर्धा,गुरनोली तसेच आता चिखली- धमदीटोला – वडेगाव परिसरात वनकर्मचारी गस्त करीत असल्याचे समजते. अनुचित घटना होऊ नये याकरिता नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.
