आजपासून गडचिरोलीत ‘सरस’ महोत्सव : महिला बचत गटांच्या उत्पादनांची भव्य विक्री व प्रदर्शनी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनी महोत्सवाला आजपासून (दि. २३ डिसेंबर) सुरुवात होत आहे. हा महोत्सव दि. २६ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे सुरू राहणार आहे.
या चार दिवसीय महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील ६० महिला स्वयंसहायता बचत गटांचे स्टॉल सहभागी होणार असून, महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांची विक्री थेट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मध, जांभूळ व सिताफळ प्रक्रियेतून तयार केलेले पदार्थ, मोहापासून बनवलेले पारंपरिक खाद्यपदार्थ, लाकडी हस्तकलेच्या व शोभेच्या वस्तू, कुक्कुटपालन व मत्स्यपालनाशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच पीएमएफएमई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी उत्पादनेही येथे उपलब्ध आहेत.
प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेली लोणची, चटण्या, घरगुती मसाले, पापड, कुरडई, वनउपजावर आधारित खाद्यपदार्थ, ग्रामीण कलाकुसरीच्या वस्तू यांसह विविध प्रकारच्या उत्पादनांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यासोबतच सावजी मटन, बंगाली फिश, बंगाली स्वीट्स तसेच भामरागड, एटापल्ली व कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत.
या ‘सरस’ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी महिलांना शहरी बाजारपेठेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, लघुउद्योगांच्या माध्यमातून कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या विक्री व प्रदर्शनातून ग्रामीण व आदिवासी संस्कृतीचे वैविध्य शहरी नागरिकांना अनुभवता येणार आहे.
सदर महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांनी या भव्य ‘सरस’ विक्री व प्रदर्शनीला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #SARASFestival #Gadchiroli #WomenSHG #UMED #RuralDevelopment #WomenEmpowerment #SelfHelpGroups #LocalProducts #TribalProducts #HandmadeProducts #SupportLocal #RuralEconomy #MadeInVillage #SHGProducts













