धानोरा : आदिवासी जीवनसंघर्षाचे सशक्त दर्शन घडविणारे पथनाट्य

118

धानोरा : आदिवासी जीवनसंघर्षाचे सशक्त दर्शन घडविणारे पथनाट्य
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : धानोरा येथे हेल्पिंग हॅन्ड बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने आदिवासी जीवनावर आधारित प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्यात आदिवासी समाजाच्या दैनंदिन संघर्षांचे, हक्कांचे व अन्यायाविरोधातील लढ्याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले.
पथनाट्यात बाहेरील कंपन्यांचे दलाल व काही ठेकेदारांकडून आदिवासींच्या जंगल-जमिनी बळकावण्याचे प्रकार ठळकपणे मांडण्यात आले. या अन्यायाविरोधात आदिवासी समाज एकजुटीने उभा राहून आपल्या हक्कांसाठी व न्यायासाठी कसा संघर्ष करतो, हे सशक्त अभिनयातून प्रभावीपणे दाखवण्यात आले.
तसेच “पर्यावरण वाचवा – देश वाचवा” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचा एकच ध्यास समाजाने स्वीकारावा, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पर्यावरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज अधोरेखित करत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या पथनाट्याच्या सादरीकरणात आयटीआय धानोरा येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांच्या प्रभावी व जिवंत अभिनयामुळे पथनाट्य अधिक परिणामकारक ठरले आणि प्रेक्षकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा पायल मशाखेत्री तसेच ॲड. सुदत्त वाघमारे यांनी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य केले. कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थेचेही आयोजन करण्यात आले होते.
हेल्पिंग हॅन्ड बहुद्देशीय संस्था सातत्याने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून समाजप्रबोधनाचे कार्य करत असून, अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य करीत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here