– नागरिक व चामोर्शी पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : जिल्ह्यातील चामोर्शी शहरातील एका ज्वेलरी दुकानदारावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या तिघांच्या चामोर्शी पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर दोघेजण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १५ हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३० मे रोजी रात्रो १०.१० ते १०.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सरताज खान इजहार खान (वय ३५) रा. रामाळा तलाव, बगल खिडकी, चंद्रपूर तह. व जि. चंद्रपूर, अमन अक्रम खान, ( वय २२) रा. रामटेकेवाडी ताडबन वार्ड नं. ०२ शाई चौक चंद्रपूर तह. व जि. चंद्रपूर व गुलाम अहमद रजब अली (वय ३२ ) धंदा-मजूरी, रा. वार्ड नं. ०२ राजूर ईजारा पोस्टे राजुर कॉलरी वणी तह. वणी जि. यवतमाळ यांचा सामवेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चामोशी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ ३० मे २०२४ रोजी रात्रो १०.१० ते १०.१५ वाजताच्या सुमारास काही संशयीत इसम फिरतांना दिसून आल्याने तीन इसमांना गावातील नागरीकांनी पकडून ठेवून त्यांचे काही साथीदार चारचाकी वाहन घेवून पळून गेले. अशी माहिती पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार यांना फोनद्वारे मिळाली असता प्रभारी अधिकारी पुल्लरवार यांचेसह अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम शाळेजवळ पोहचताच त्यांना सदर ठिकाणी काही इसमांची गर्दी दिसून आली. यावेळी त्यांची पोलीसांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, सरताज खान इजहार खान याचेकडे १४.३ सेमी बॅरेलची लांबी, लाकडी पिस्टल ग्रिप असलेले एक देशीकट्टा (अग्निशस्त्र) अंदाजे किंमत ५ हजार व त्यासोबत एक जिवंत ८ एमएम काडतूस अंदाजे किंमत ३०० रुपये मिळून आले. सदर अग्निशस्त्राच्या परवाणाबाबत त्याच्याकडे तपासणी केली असता, त्याचेकडे सदर शस्त्राबाबत कोणताही परवाणा मिळून आला नाही. तसेच अमन अक्रम खान याचेकडे एक निमूळते टोक असलेले धारदार शस्त्र (चाकू) अंदाजे किंमत ५०० रुपये व त्यासोबतच रेडमी कंपनिचा मोबाईल अंदाजे किंमत १० हजार रुपये असलेला मिळून आले. यासोबतच गुलाम अहमद रजब अली याचेकडे लाल रंगाचे मिरची पावडरची पुडी अंदाजे किंमत १५ रुपये मिळून आली. तर तिघांची सखोल विचारपूस करुन चौकशी केली असता ते गावातील ज्वेलरी दुकानदार हे दुकान बंद करुन आपल्या सोबत पैशांची बँग घेऊन जात असतात. त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तिथे ५ जण आले होते तर त्यातील दोघेजण कार मध्येच बसून होते. दरम्यान तिघांवर तेथील नागरिकांना संशय बळावल्याने तिघांनाही नागरिकानी पकडुन ठेवले व दोघेजण फरार झाल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने मुद्देमाल जप्त करून पाचही जणांवर बंदूक व चाकू दाखवून ज्वेलरी दुकानदार यांचेवर दरोडा टाकण्याचे उद्देशाने आले असल्यामूळे कलम ३९९ भादंवि सहकलम ३/२५, ४/२५ भाहका तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मनाई आदेश कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याने कलम १३५ मपोका अन्वये पोस्टे चामोर्शी येथे गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली व अन्य दोन फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चामोर्शी येथील प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार, पोउपनि. बालाजी लोसरवार, पोउपनि. दुर्योधन राठोड, मपोउपनि. राधा शिंदे, पोहवा राजेश गणवीर, पोहवा व्यंकटेश येल्लला यांनी पार पडली. या घटनेत शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत तीन संशयीत इसमांना पकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य नागरिकांनी करावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी सर्व जनतेला केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #chamorshi )