लॉयड्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी : राज्य–जिल्हास्तरावर पदकांचा पाऊस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि लॉयड्स राज विद्या निकेतन (एलआरव्हीएन) शाळेच्या खेळाडूंनी अलीकडे पार पडलेल्या राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत पदकांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. ब्रह्मपुरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे Brahmapuri Sports Festival 2026 अंतर्गत चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तसेच गडचिरोली येथील जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपली छाप उमटवली.
राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अंडर-18 मुलींच्या गटात लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची मोनिका मडावी हिने लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावत विजेतेपद मिळवले, तर 100 मीटर धावण्यात रौप्यपदक जिंकत दुहेरी यश साकारले. एलआरव्हीएन शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री मुलमा हिने अंडर-14 मुलींच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात कांस्यपदक मिळवत आपली अष्टपैलू क्षमता सिद्ध केली.
याचवेळी गडचिरोली येथील पायलट प्रोजेक्ट आर्चरी सेंटरमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही लॉयड्सच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. अंडर-15 मुलींच्या गटात पल्लवी सुरेश गोडसेलवार हिने सुवर्णपदक तर पूर्वी विकास देबनाथ हिने रौप्यपदक जिंकले. अंडर-15 मुलांच्या गटात सागर सुब्रत सरकार याने सुवर्णपदक पटकावले. अंडर-13 गटात उज्ज्वल दिनेश दास याने कांस्यपदक मिळवले, तर अंडर-10 गटात अनिश बुधन सिंकू याने रौप्यपदक जिंकत उल्लेखनीय यश मिळवले. विशेष म्हणजे शालेय गटातील सर्व पदक विजेते एलआरव्हीएन शाळेचेच होते, ही बाब विशेष ठरली.
कोन्सारी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनीही तिरंदाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला. सौरभ राऊत याने अंडर-15 मुलांच्या गटात (डिस्टन्स व इंडिव्हिज्युअल प्रकार) कांस्यपदक पटकावले, तर गौरी गावतुरे हिने अंडर-15 मुलींच्या गटात डिस्टन्स प्रकारात द्वितीय आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यश नोंदवले.
संरचित प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध क्रीडा वातावरण या भक्कम पायाभूत सुविधांमुळे लॉयड्सचे खेळाडू सातत्याने यश संपादन करत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंना संधी देण्याच्या ध्येयाने लॉयड्सकडून क्रीडा विकासासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. Lloyds Metals and Energy Limited चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली उभारलेल्या अत्याधुनिक क्रीडा सुविधांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत असून जिल्हा आणि राज्य पातळीवर लॉयड्सचा विजयघोष घुमू लागला आहे.













