‘MRP च्या नावाखाली लूट बंद करा’; ग्राहक पंचायतचे उद्या धरणे आंदोलन
– कृत्रिम किंमतवाढ, भ्रामक सवलती आणि अवाजवी नफेखोरीविरोधात केंद्र सरकारकडे निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, बियाणे, कीटकनाशके तसेच विविध कृषी निविष्ठांवर कृत्रिमरीत्या वाढविण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमतींमुळे (MRP) ग्राहक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार, १२ जून रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनानंतर केंद्र सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.
सध्या अनेक उत्पादने उत्पादन खर्चाच्या तुलनेत अवास्तव दराने विकली जात असून, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक सवलती आणि कृत्रिम किंमतवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि वाजवी नफा यावर आधारित एसआरपी (Suggested Retail Price) प्रणाली लागू करावी, उत्पादन खर्चाची माहिती सार्वजनिक करावी तसेच QR कोडच्या माध्यमातून किंमत पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अवाजवी नफेखोरी आणि कृत्रिम किंमतवाढ रोखण्यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, तसेच MRP सुधारणा आणि किंमत नियंत्रणासंदर्भातील अभ्यास समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. ग्राहक, शेतकरी आणि रुग्णांचे आर्थिक हित जपण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका ग्राहक पंचायतने मांडली आहे.
दिल्ली येथील जंतर-मंतरवर १२ जून रोजी राष्ट्रीय स्तरावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने देशभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयांवर आंदोलन करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे सकाळी १० वाजता कारगिल चौकात धरणे आंदोलन होणार असून, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला जिल्हाध्यक्ष उदय धकाते, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे, सचिव अरुण पोगळे, महिला प्रमुख सुचिता धकाते, पर्यावरण प्रमुख डॉ. देवेंद्र मुनघाटे, एम. डी. मेश्राम, आशाताई कोकोडे, मेघाताई कोतपल्लीवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या आंदोलनात ग्राहक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.














