– सरकारी शाळांच्या दुरवस्थेविरोधात आम आदमी पार्टीचा आवाज बुलंद
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या दयनीय अवस्थेविरोधात आम आदमी पार्टी, गडचिरोली जिल्हा युनिटच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालय, काम्प्लेक्स एरिया येथे प्रतीकात्मक “झोपा काढा” आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा अध्यक्ष नासिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात प्रवेश करत शाळा सुधारणा, जीर्ण इमारतींची दुरुस्ती, शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्काळ भरती आणि कंत्राटी शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याच्या मागणीवर आधारित घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना अडविल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वाराजवळ झोपा काढून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. जीर्ण आणि धोकादायक शाळा इमारती, तब्बल १,५९९ शिक्षक व लिपिकांची रिक्त पदे, ८४ शाळांमध्ये शिक्षकांचा पूर्णपणे अभाव, कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन, तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली ७२ शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कोरची तालुक्यातील परिस्थिती तर अधिकच भयावह असून कोसमी, सोनपूर, भूर्यालदंड आणि पकनाभट्टि येथील शाळा पूर्णपणे धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. भूर्यालदंड येथील शाळेतील एका खोलीचा स्लॅब कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी बाळासाहेब पवार यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी शाळांच्या दुरुस्ती आणि कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन देण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन दिले. मात्र शासनाने ठोस निर्णय घेईपर्यंत आम आदमी पार्टी आपला लढा सुरू ठेवणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान जिल्हा अध्यक्ष नासिर हाशमी यांनी शासनावर तीव्र शब्दांत टीका करताना सांगितले की, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न शासनाच्या निष्क्रियतेमुळे धोक्यात आले आहे. जीर्ण शाळा, शिक्षकांची कमतरता आणि कंत्राटी शिक्षकांचे थकीत वेतन यामुळे शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. शासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास आम आदमी पार्टी आणखी तीव्र आंदोलन उभारेल. गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारने आधी शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था सुधारावी, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी, संघटक ताहीर शेख, सचिव अमृत मेहेर, संगठन मंत्री चेतन गहाणे, अहेरी तालुका प्रमुख नागेश तोरेम, सिरोंचा तालुका प्रमुख सिराज पठाण, कुरखेडा युवा अध्यक्ष अतुल सिंदराम, देसाईगंज शहर अध्यक्ष आशिष घुटके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवून जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर तातडीने तोडगा निघावा, अशी मागणी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilatestnews
#Gadchiroli #AAPProtest #ZopaKadhaAndolan #EducationCrisis #ContractTeachers #SchoolInfrastructure #StudentRights #SaveEducation #गडचिरोली #झोपा_काढा_आंदोलन #आमआदमीपार्टी #शिक्षण_संकट #कंत्राटी_शिक्षक #शाळांची_दुरवस्था #विद्यार्थीहक्क #शैक्षणिक_आंदोलन












