मेंढा (लेखा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

40

मेंढा (लेखा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
– रक्तदाब, मधुमेह तपासणीसह औषधांचे वाटप; आयएएस उत्तीर्ण उमेदवारांची अभ्यासदौऱ्यातून भेट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १२ : धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिरादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची सखोल तपासणी करून आवश्यक त्या औषधांचे वाटप केले. अनेक नागरिकांनी प्रथमच अशी सर्वसमावेशक तपासणी करून घेतल्याचे सांगितले.
यावेळी डॉक्टरांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात अशा प्रकारची शिबिरे वारंवार आयोजित करण्यात यावीत, अशी मागणीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, आयएएस परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी अभ्यासदौऱ्यानिमित्त मेंढा येथे भेट देऊन गावातील प्रशासन व विकासकामांची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास भेट देत विद्यार्थी स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, नायब तहसीलदार बारापात्रे, गटविकास अधिकारी वानखेडे, स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयोजक, वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here