अबब..! प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफियांची लाखोंची लूट, वाकडी घाटात रात्रीच्या अंधारात अवैध उपशाचा धुमाकूळ
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २५ : तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी घाट परिसरात सध्या अवैध रेती उपसा आणि तस्करीचा मोठा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याने शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकडी घाट परिसरात रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन केले जाते. त्यानंतर विविध मार्गांनी ही रेती इतर ठिकाणी पोहोचविली जात असल्याचे सांगितले जाते. दिवसा शांत भासणारा घाट रात्री मात्र रेती माफियांच्या हालचालींनी गजबजलेला असतो. संबंधित यंत्रणांचा कोणताही धाक नसल्याप्रमाणे हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासन अनभिज्ञ की मूकदर्शक?
वाकडी घाट हा तालुका मुख्यालयालगत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करीची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाला याची कल्पना नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
तस्करांच्या पाठीशी कोणाचा वरदहस्त?
कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीच्या पाठबळाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करणे शक्य नसल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. रेती माफियांना कोणाचे संरक्षण मिळत आहे, याबाबतही नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अवैध रेती उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून नदीपात्राचे नैसर्गिक संतुलनही धोक्यात येत आहे. पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या प्रकारामुळे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान वाकडी घाटातील अवैध रेती उपसा आणि तस्करीच्या या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकारी तातडीने कारवाई करणार का, की रेती माफियांचा हा बेकायदेशीर धंदा असाच सुरू राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.













