सावधान! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची जाहिरात बनावट, सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहा
– अधिकृत भरतीची माहिती केवळ संकेतस्थळ व वृत्तपत्रांमधूनच, नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर (Peon) पदभरतीसंदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे बनावट, खोटी व दिशाभूल करणारी असल्याचा स्पष्ट खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केला आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत शाळांमध्ये परिचर पदांची भरती होणार असल्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जाहिरातीत गडचिरोली, अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा, देसाईगंज व धानोरा तालुक्यातील शाळांमध्ये प्रतिमहा २२ हजार रुपये वेतनावर भरती करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने या जाहिरातीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित जाहिरात जिल्हा परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नसून ती अज्ञात व्यक्तींनी तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा परिषदेमार्फत कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यास त्यासंदर्भातील अधिकृत जाहिरात केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मान्यताप्राप्त दैनिक वृत्तपत्रांमध्येच प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे.
दरम्यान, बेरोजगार युवक-युवती, पालक आणि नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित भरती जाहिरातींची सत्यता पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही संशयास्पद जाहिरात आढळल्यास संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
“भरतीची जाहिरात दिसताच पैसे भरू नका; आधी खात्री करा”
सोशल मीडियावरून बनावट भरती जाहिरातींचे प्रमाण वाढत असल्याने युवकांनी सावध राहण्याची गरज आहे. अधिकृत संकेतस्थळ आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींनाच वैध मानावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













