– शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २७ डिसेंबर : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा धरणामध्ये अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असा प्रश्न मंगळवारी विधानपरिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी उपस्थित केला. यावर झालेल्या चर्चेत मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.
मागील महिनाभरापासून सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकरी अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्यात यावा, नव्याने सर्वेक्षण करून बाधित क्षेत्राचे देखील अधिग्रहण करून त्याचाही मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी साखळी उपोषण केले. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी हा मुद्दा मंगळवारी विधानपरिषदेत लावून धरला.
काही दिवसांपूर्वी ते गडचिरोली येथे आले असता पीडित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमक्ष आपली व्यथा मांडली होती. हीच व्यथा आमदार पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित करून शेतकऱ्याना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली. या प्रश्नांवरील उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असल्याचे सांगितले.
गेल्या ४ वर्षांपासून पीडित शेतकरी आंदोलने करीत आहे. अनेक मंत्र्यांना त्यांनी निवेदने दिली. पण हा प्रश्न जैसे थे होता. परंतु आमदार भाई जयंत पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मेडीगट्टा धरणग्रस्तांच्या या प्रश्नांचा पाठपुरावा केला. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. शासनाने शब्द न पाळल्यास पुन्हा आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिला आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC) (Shekap MLA Bhai Jayant Patil raised the issues of Medigadda dam victims in the Legislative Council)