चातगाव ग्रामसभेत लोकसंवाद ; विकास कामांचा आढावा, नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा

75

चातगाव ग्रामसभेत लोकसंवादv; विकास कामांचा आढावा, नागरिकांच्या समस्यांवर थेट चर्चा
– शिक्षण, घरकुल, पाणीपुरवठा, अवैध दारू विक्रीसह विविध प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रशासनाला निर्देश
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १८ : धानोरा तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायतीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेत शिक्षण, आरोग्य, घरकुल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सामाजिक प्रश्न, अवैध दारू विक्री तसेच बंद पथदिवे आदी स्थानिक समस्यांवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला.
ग्रामस्थांनी चातगाव व सिंगापूर येथे जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याची मागणी, प्रलंबित घरकुल प्रकरणे आणि नियमित ग्रामसभा न होण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर आमदार नरोटे यांनी मागील गावभेटीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार झालेल्या विकासकामांचा आढावा घेत उर्वरित प्रलंबित प्रश्नांवर संबंधित विभागांच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
या ग्रामसभेला चातगावसह कुडकवाही, टोला आणि कटेझरी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध समस्या मांडल्या. यावेळी गटविकास अधिकारी रोशन दुबे, सरपंच गोपाल उईके, उपसरपंच भूमिका धुळसे, तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, सुभाष धाईत, सुभाष खोबरे, राकेश दास, अविनाश पोरेटी, गिरीधर जराते, नितीन कोत्तावार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या प्रत्येक प्रश्नाचे प्राधान्याने निराकरण करून विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here