‘माओवादी’ बनून दहशत माजविण्याचा कट उधळला; गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत दोघे जेरबंद

163

‘माओवादी’ बनून दहशत माजविण्याचा कट उधळला; गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत दोघे जेरबंद
– जिजावंडी मार्गावर बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न, अन्य आरोपींचा शोध सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचे भासवून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. पिपली बुर्गी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिजावंडी टोल्याकडे जाणाऱ्या मार्गावर माओवादी नावाने बॅनर व पत्रके लावून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोघांना जेरबंद केले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२६ रोजी पिपली बुर्गीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर जिजावंडी टोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलकाजवळ लाल रंगाचे कापडी बॅनर आणि दोन पत्रके आढळून आली होती. या बॅनर व पत्रकांवरील मजकुरातून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर १४ जुलै रोजी पिपली बुर्गी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे शिवा अनिल मिस्त्री (वय ४८, रा. तरुणनगर, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड) आणि रोहित रणजित मल्लीक (वय २५, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) यांनी माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणात इतर काही जणांचाही सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी अफवा किंवा भूलथापांना बळी पडू नये, समाजात भीती किंवा दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी सातत्याने राबविलेल्या विशेष मोहिमा आणि ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील माओवादी कारवायांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here