वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड ; पीडितास व्याज देणार

454

– विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर
The गडविश्व
मुंबई, २७ जुलै : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ३० दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.
या विधेयकावर बोलतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.
या विधेयकावर बोलतांना विधान सभा आणि विधान परिषदेत सर्वपक्षीय विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेत विधायक सूचना मांडल्या. याबद्दल वनमंत्री मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. या सूचनांमधील अनेक गोष्टी विधेयकांच्या थेट कक्षेत येत नसल्याने आमदारांच्या सूचनांसंदर्भात एक व्यापक व विस्तृत बैठक अधिवेशन संपल्यानंतर लवकरच आयोजित करण्यात येईल, असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य व पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते. तसेच गंभीर इजा ही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करून त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील ३० दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करून पीडितास देण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत या विषयावर बोलतांना मंत्री मुनगंटीवार यांनी याविषयावर रचनात्मक सूचना केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ‘जंगल से जीवन के मंगल तक’ हे वन विभागाचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर वन समित्या बनत आहेत, त्या समित्यांवर स्थानिक विधान परिषद सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here