देऊळगाव धान खरेदी घोटाळ्यात नवा वळण ; मुख्य सूत्रधार महेंद्र मेश्राम पोलिसांच्या जाळ्यात

683

– ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील बहुचर्चित ४ कोटी रुपयांच्या देऊळगाव धान खरेदी घोटाळ्यात मुख्य आरोपी महेंद्र मेश्राम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. तब्बल चार महिने फरार राहिल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा व्यवस्थापक असलेला मेश्राम हा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. बनावट बिले तयार करणे, शेतकऱ्यांच्या नावावर जास्त खरेदी दाखवणे आणि निधीचा अपहार करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. तपास सुरू झाल्यानंतर तो फरार झाला होता.
या प्रकरणी एकूण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंधारी दडगये, संचालक भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे, भीमराव शेंडे यांसह इतरांना यापूर्वीच अटक झाली होती. काहींना तुरुंगवास भोगावा लागला तर सध्या बहुतेक संचालक जामिनावर आहेत. दरम्यान, या घोटाळ्यात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावरही आरोप झाले होते, मात्र त्यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
तपासात १० हजार क्विंटल धानाची हेराफेरी झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिल्यानंतर कुरखेडा पोलिसांनी कारवाई सुरू केली. सध्या पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, मेश्रामच्या अटकेनंतर आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
हा घोटाळा स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवणारा ठरला आहे. महेंद्र मेश्रामकडून तपासात कोणते नवे धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #कुरखेडा #देऊळगाव #धानखरेदीघोटाळा #महेंद्रमेश्राम #कोट्यवधीघोटाळा #पोलिसकोठडी #भ्रष्टाचार #शेतकरी #गडचिरोलीबातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here