– ग्रामसभेत महिलांच्या पुढाकारातून निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : मुलचेरा तालुक्यातील येल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागुलवाही येथे नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेतला तसेच दारूबंदी ठराव समिती गठित करण्यात आली असून दारुविक्रेत्याच्या जाळ्यातून आपल्या गावाला मुक्त करण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.
येल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणारे नागुलवाही हे गाव वगळता सर्वच गावातून अवैध दारू हद्दपार झाली आहे. परिसरातील 16 गावांमध्ये ग्रामस्थांच्या पुढाकारातून मागील 5 ते 6 महिन्यांपासून दारूबंदी आहे. परंतु, नागुलवाही या गावात अवैध दरुविक्रेते सक्रिय आहेत. त्यामुळे परिसरातील मद्यपी दारू पिण्यासाठी या गावाकडे धाव घेतात. या गंभीर समस्येतून मुक्त होण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच आयोजित ग्रामसभेत नागुलवाही येथील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून अवैध दारुविक्रीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ग्रामसभेमध्ये मुक्तिपथ टीमने दारूचे दुष्परिणाम , अधीकार ,कायद्याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामसभेमध्ये सर्वानुमते दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला. गावात कुणीही दारूविक्री करताना आढलून आल्यास संबंधित विक्रेत्यास ग्रामपंचायत तर्फे मिळणारे दाखले बंद, शासकीय योजना ,रेशन बंद असेही ठरविण्यात आले.
या निर्णयाची अंमलबजावणी करीत गावाला दारूविक्री मुक्त करण्यासाठी महिला संघटना गठित करण्यात आली. या दारूबंदी ठराव समितीचे अध्यक्षपदी कांता वाघाडे, सचिव आशा वाघाडे, उपाध्यक्ष मनीषा वाघाडे, सहसचिव म्हणून शुभांगी वाघाडे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी गीता वाघाडे, जाईबाई टेकाम, संगीता राऊत, गीता मराठे, लीना विश्वास, कानल राऊत, लता डायले, उषा मंडरे, सुरेखा राऊत, शुभांगी सोनटके, सुनीता वाघाडे, नलिना मंडरे, बेबीताई वाघाडे, गंगुबाई टेकाम, सविता मडावी, स्वाती पोलादवार, सरिता वाघाडे यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेला उपसरपंच दिवाकर उराडे, ग्रा. पं. सदस्य नरेश राऊत, ग्रामसेवक प्रदीप गेडाम, ग्रा.प.सदस्य दिवाकर सिडाम , माजी पोलिस पाटील मानिराम राऊत, पेसा अध्यक्ष सुधाकर टेकाम व मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )