आलापल्ली मॅरेथॉनमध्ये लॉयड्स अकादमीची चमक; यश, मोनिकाने पटकावली रौप्यपदके
The गडविश्व
आलापल्ली, दि. २२ : आलापल्ली येथे आयोजित आलापल्लीचा राजा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन रौप्यपदकांवर नाव कोरले. पुरुषांच्या ५ किलोमीटर आणि महिलांच्या ३ किलोमीटर गटात अकादमीच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावत आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली.
आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळाच्या वतीने या जिल्हास्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या खुल्या ५ किलोमीटर गटात यश बुधाकर याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. प्रतिकूल परिस्थितीतही वेग आणि सहनशक्ती कायम राखत त्याने हे यश मिळविले.
महिलांच्या ३ किलोमीटर गटात मोनिका सानू मडावी हिनेही प्रभावी कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. यश आणि मोनिकाच्या या कामगिरीमुळे लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या शिरपेचात आणखी दोन पदकांची भर पडली आहे.
या यशामागे खेळाडूंचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि शिस्तीसोबतच अकादमीच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि स्पर्धांचा अनुभव मिळत असल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यापक व्यासपीठ मिळत आहे.
या कामगिरीबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी यश बुधाकर, मोनिका मडावी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. दुर्गम भागात विकसित करण्यात आलेल्या क्रीडा सुविधांमुळे युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीनेही दोन्ही खेळाडूंच्या मेहनत, शिस्त आणि चिकाटीचे कौतुक केले. या यशामुळे अकादमीतील इतर युवा खेळाडूंनाही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी प्रेरणा मिळणार आहे.













