The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील ग्रामपंचायतमध्ये आयोजित ग्रामसभेमध्ये अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच महिलांनी अहिंसक कृतीचे शस्त्र उगारत गावातील दारूविक्रेत्याकडील जवळपास ४२ हजार रुपये किमतीची दारू व साहित्य नष्ट केले. तसेच पुन्हा अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास ३० हजार रुपयांचा दंड व कायदेशीर कारवाई करण्याचेही ठणकावून सांगण्यात आले.
पलसगड गावामध्ये अवैध दारूविक्री सुरु असल्याने महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. नुकतीच गावात मुक्तिपथ तालुका चमूच्या उपस्थितीत गाव संघटन व शक्तिपथ संघटनेची बैठक पार पडली. यावेळी महिलांनी आपल्या गावातील अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचे ठरविले. अशातच सरपंच मीनाक्षी गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत दारूबंदीचा विषय मांडण्यात आला. यावेळी महिला पेटून उठल्या व त्यांनी दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला. तसेच गावात निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री केल्यास ३० हजारांचा दंड वसूल करण्याचेही ठरविण्यात आले. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी समिती देखील गठीत करण्यात आली. दरम्यान, गावातील महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली. महिलांनी शोधमोहीम राबवून जवळपास ४२ हजारांची देशी व मोहफुलाची दारू, साहित्य नष्ट केले.
सभेमध्ये ग्रामसेविका प्रज्ञाताई फुलझेले, माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती शामिनाताई उईके, विनायक कुंबरे, तंटामुक्त अध्यक्ष रामदास मडावी, पोलीस पाटील सुष्मा दर्रो, देवराव ठाकरे, मोहन आत्राम, सुगंधा पुराम, विमल राजेंद्र कसारे, वंदना कोवे, सरस्वतः हलामी, शांताबाई ठाकरे, कमलाबाई ठाकरे, कुंदा विनोद कुंबरे, भागुबाई लुहू़ंगुर , मनीषा मंगेश लोहट, कुंदा जगन मडावी, निशा मडावी, मंगला कुमरे, कल्पना तुलावी, मोहिता नैताम, रामप्रसाद सेन कपाट, मुक्तिपथ तालुका प्रभारी शारदा मेश्राम, तालुका प्रेरक जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolichimur #muktipath )