विकासकामांच्या नावाखाली निधी लाटण्याचा सपाटा

805

– कोटगल बॅरेजला भेट दिल्यानंतर ॲड. सुरेश माने यांचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली शेकडो कोटींची प्रकल्प मंजूर करण्यात येवून सुरू करण्यात आली आहेत. ही विकासकामे करतांना येथील जनतेच्या हिताला प्राधान्य न देता सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना निधी कसा पदरात पाडून घेता येईल याकडे जास्त लक्ष दिल्या जावून जनतेच्या हक्काच्या पैशांची वासलात लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी केला आहे.
गडचिरोली येथे आयोजित आंबेडकरी कार्यकर्ता महामेळाव्या निमित्त आले असता ॲड.सुरेश माने यांनी कोटगल बॅरेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्टेडियम ला भेटी देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, बीआरएसपीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, पत्रकार हेमंत डोर्लीकर, भाई अक्षय कोसनकर उपस्थित होते.
कोटगल बॅरेज हा ३६५ कोटींचा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याकरिता बुडीत क्षेत्र म्हणून २५५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली असून ६६२० हेक्टर शेतीकरिता लाभ होणार आहे. मात्र सध्या या बॅरेजच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी विमानतळ, विद्यापीठ इत्यादी कामांसाठी गैरपध्दतीने संपादीत करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून केला जात आहे. तसेच चुकीच्या नियोजनामुळे भविष्यात संपूर्ण गडचिरोली शहराला पुरबुडीचा धोका निर्माण होणार आहे.
जिल्हा स्टेडियम आणि शासकीय रुग्णालयामध्येही बांधकामाचा मोठा सावळागोंधळ सुरू असून निकृष्ट दर्जाची आणि नियोजनशून्य कामे करुन जनतेच्या हक्काच्या पैशांची सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची खिसे भरण्यासाठी केली जात असल्याने गडचिरोलीत बोगस विकासाच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे आंदोलनात्मक आणि न्यायालयीन लढाई उभी करण्यात येणार असल्याचा इशारा ॲड. सुरेश माने यांनी दिला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kotgalbarage addrsureshmane)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here