कुरखेडा : रानडुक्कराची शिकार प्रकरणी तिघांना अटक

974

-आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी
The गडकरी
ता.प्र / कुरखेडा, दि.१४ : रानडुक्कराची शिकार करुन वाहतूक करीत असताना पुराडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने तिघांना अटक केल्याची कारवाई शुक्रवारी पुराडा-डोंगरगाव मार्गावर करण्यात आली. सागर फकिरा यादव (२२), शाम तिलोचन मरकाम (१८) दोघेही रा. विजेभाटा जि. राजनांदगाव (छत्तीसगड) व लहूजी काशीराम नागपूरे (४५) रा. नागभिड जि. चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, रानडुक्कराची शिकार करुन अवैधरित्या मासांची वाहतूक केल्या जाणार असल्याची गोपनीय माहिती वडसा वनविभागांतर्गत येत असलेल्या पुराडा वनपरिक्षेत्र कार्यालयाला प्राप्त झाली असता त्या माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या नेतृत्वात पुराडा वनपरिक्षेत्राधिकारी बी. एच. डिगोळे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी सापळा रचण्यात आला. दरम्यान दुपारच्या सुमारास वन कक्ष क्र. १०४० हद्दीतील पुराडा ते डोंगरगाव मार्गावरुन जात असलेल्या सीजी. ०८ एडब्ल्यू ५१२२ या दुचाकीने जात असलेल्या तिन संशयितांची चौकशी केली असता पिशवीमध्ये रानडुक्कर असल्याचे निदर्शनास आल्याने तत्काळ वनविभागाने तिघांनाही अटक केली. आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 9, 39, 49, 52, 57 कलम 5 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला.
तिन्ही आरोपींना १३ जानेवारीला प्रथम श्रेणी न्यायालय कुरखेडा स्थित आरमोरी यांच्यासमोर हजर करण्यात केले असता न्यायाधिशांनी आरोपींचा जामिन रद्द करीत सात दिवसांची १९ जानेवारीपर्यंत चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी केली आहे.
या शिकार प्रकरणात विशेष करून छत्तीसगड राज्यातील दोन आरोपींचा समावेश असल्यामुळे वडसा वनविभागात छत्तीसगड राज्यातील शिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याची शंका व्यक्त होत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kurkheda, crime news, forest news, purada)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here