कुरखेडा : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १२ : कुरखेडा-वाकडी मार्गावरील नगरपंचायतीच्या डम्पिंग यार्डासमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर आदिवासी विकास महामंडळाचे विपणन निरीक्षक गंभीर जखमी झाले. दोन भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या या धडकेने परिसरात एकच खळबळ उडाली.
गोठणगाव येथील धर्मराज तुळशीराम बोदेले (वय ३५) हे मित्र युवराज ठेंगरे (वय ३४) यांच्यासह कामानिमित्त दुचाकीने वाकडीकडे जात होते. त्याचवेळी वाकडीहून कुरखेड्याकडे येणाऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की धर्मराज बोदेले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर युवराज ठेंगरे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसऱ्या दुचाकीवरील रमाकांत कासकर (वय ४८) हे गंभीर जखमी झाले. कासकर हे कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, या दुर्घटनेमुळे कुरखेडा परिसरासह गोठणगाव गावावर शोककळा पसरली आहे. धर्मराज बोदेले यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews













