– प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २१ फेब्रुवारी : ढाणकी शहरात अत्यंत धीम्या गतीच्या नेटवर्कच्या अडचणीने मोबाईल वापरणारे ग्राहक मात्र सध्या हैराण आहेत तसेच जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आल्यापासून अनेक ठिकाणी ग्राहक व व्यापारी सुद्धा सर्वच ऑनलाईन माध्यमाद्वारे व्यवहार करतात त्यामुळे सद्यस्थितीत मोबाईलचा वाढता वापर बघता सर्वच मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज दरामध्ये कमालीची वाढ केली असून कंपनीची चांदी होत आहे पण ग्राहक मात्र सुविधेपासून उपाशी व अससुविधा देणाऱ्या कंपन्या मात्र तुपाशी अशीच अवस्था ढाणकी शहरांमध्ये बघायला मिळत आहे. काही दिवसांपासून कॉल ड्रॉप होणे, जलद कॉल न लागणे, इंटरनेटचा स्पीड तर एकदम म्हशीच्या वेगासारखा असतो अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत त्यामुळे “धनी दिलगीर आणि चोरटे खुशाल” ही बाब तंतोतंत लागू होते.
शासनाचेही नियंत्रण या कंपनीवर दिसत नाही. ज्यावेळी ग्राहक रिचार्ज करतो त्यावेळी काही भाग अशा कंपन्या या ग्राहकामार्फत शासनाला सुद्धा जादा दराप्रमाणे वसूल करून याचा महसूल शासनाला जातो, असे असल्यानंतर शासनाचे नियंत्रण या सर्व बाबीवर असायला पाहिजे पण कोणालाच काही ग्राहकाचे पडले नाही सगळ्यांचे “खाऊन पिऊन टर ग्राहकांचे मात्र कुडा-कुंडात नदी नाल्यात गेले घर अशी गत सध्या दिसत आहे. कोणत्याही कंपनीचा २८ दिवसासाठी चा इंटरनेट व कॉलिंग प्राप्तीसाठी फोन धारकांना कमीत कमी २५० रुपये एवढी किंमत मोजावी लागते हा सध्याचा महिन्याचा सर्वात कमी दर आहे तर जास्तीत जास्त पाचशे ते हजार रुपये मोजावे लागते. एका घरात कमीत कमी तीन मोबाईल असतात यासाठी कुटुंबाला अतिरिक्त स्वरूपात खर्च करावा लागतो. सर्वसामान्यांना हा खर्च न पडणारा झाला आहे परंतु ग्राहकाला रिचार्ज केल्याशिवाय कंपन्यांनी सुद्धा पर्याय ठेवला नाही. याआधी रिचार्ज नाही केलं तरी इन्कमिंग ची व्यवस्था सुरू असायची परंतु आता रिचार्ज संपताच इन्कमिंग व आउटगोइंग व्यवस्था बंद होती व काही दिवसात रिचार्ज न केल्यास मोबाईल क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला प्रदान केल्या जातो यालाच ग्यानबाची मेक म्हणायची का ? असे असताना सुद्धा ग्राहक ज्या प्रमाणात मोबदला मोजतो त्या प्रमाणात सुविधा दिल्या जात नाही. कंपन्या अपयशी ठरताना दिसत आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना ४जी च्या वेगाचे गाजर दाखवून ३ चा वेग सुद्धा मिळत नाही. कोणतीही फाईल डाऊनलोड करायची असल्यास अडचणीला सामोरे जावे लागत आहे तेव्हा बेसरम व मूकनायक झालेली यंत्रणा जागृत होऊन ग्राहकाला न्याय देतील का ?