गडचिरोली : महसुल विभागातील पूरप्रवण भागातील कर्मचाऱ्यांना विविध प्रशिक्षण

117

– राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून प्रशिक्षण सुरू
The गडविश्व
गडचिरोली, ७ जून : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांचे नागपूर येथील पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच पूरामध्ये बचाव कार्याचे प्रात्यक्षिक करण्याकरीता ०१ जुन ते १५ जुन या कालावधीमध्ये प्रशिक्षणाकरीता दाखल झालेले आहे. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता तसेच जिल्ह्यात येणाऱ्या विविध आपत्तीची माहिती तसेच विविध धोकादायक स्थळांना भेट, पोलिस विभागातील बचाव साहित्य तपासणी व बचाव पथकास मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणा अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.कुमार आशिर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, एनडीआरएफ पथक प्रमुख इन्स्पेक्टर प्रदीप यांचे उपस्थितीत सुरु करण्यात आले.
प्रशिक्षणाला पोलिस विभागातील अंमलदार तसेच बचाव पथकातील कर्मचारी तसेच आपदा मित्र यांची उपस्थिती होती. महसुल विभागातील पूरप्रवण भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस दलातील बचाव पथक, पट्टीचे पोहणारे स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १० ते ११ जुन या कालावधीत अहेरी येथे अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा या तालुक्यातील पूरप्रवण भागातील कर्मचारी यांचे करीता तसेच १२ ते १५ या कालावधीत सिरोंचा येथे सदर प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त कर्मचारी यांनी घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे. तसेच पूरामध्ये बचाव कार्य करण्याचे प्रात्यक्षिक तसेच बोट चालविण्याचे प्रशिक्षण वैनगंगा नदीमध्ये कोटगल बँरज येथे पोलिस विभागातील कर्मचारी यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here