गडचिरोली : वाघांची दहशत कायम, दोघांचा घेतला बळी

1440

– नागरिक संतप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : जिल्ह्यासह तालुक्यात नरभक्षक वाघांची दहशत कायम असून एका महिलेसह पुरुषाचा बळी घेतल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शुक्रवारी उघडकीस आला. यामुळे खलबळ उडाली असून नागरिक संतप्त आहेत. भागवानपूर येथील पुरुष धान राखणीसाठी गेलेल्या आणि हिरापूर येथे धानाची लोंबी वेचण्याससाठी निघालेल्या महिलेस हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना आहे.
भगवानपूर येथील गंगाराम कवडू फुबेलवार (५५) हे जंगलालगत असलेल्या स्वतःच्या धानाची राखण करण्यासाठी गेले होते. मुलगा व पत्नी नागपूरला राहतात. अचानक तीन दिवसांपासून ते बेपत्ता झाल्याने नागरिकांनी ते नागपूरला असावेत असा तर्क लावला होता. दरम्यान कुटुंबाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने जंगल परिसरात शोधमोहिम राबविली तेव्हा डोक्याच्या कवटीचा भाग व हाताचे पंजे आढळून आले. हाताला बांधली असलेली राखीवरून त्यांची ओळख पटली.
तर दुसऱ्या घटनेत शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी हिरापूर येथील इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) या शेतातील धान कापणी नंतरचा सरवा (लोंब) वेचण्यासाठी हिरापूर-शिवाणी मार्गाने जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.
सदर दोन्ही घटनेने जिल्ह्यात वाघाची दहशत कायम असून यामुळे नागरिक भयभीत झाले असून संतप्त आहेत. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही नागरिक सातत्याने करीत आहे. तर वाघाच्या दहशतीने शेती करायची काशी असा देखील सवाल शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here