– कामाची देश पातळीवर दखल, राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबरला सन्मान
The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या देशपातळीवर पुरस्कारासाठी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे. दिव्यांग बांधवांना आदिवासी पाड्यापर्यंत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करणारा गडचिरोली हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आदिवासी जिल्हा ठरला आहे. त्या कार्याची दखल घेत या राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कारासाठी गडचिरोलीची निवड करण्यात आली आहे.
दिव्यंगत्वाशी झुंजणाऱ्या आदिवासी बांधवांसर्वांच्या सर्वांगिण पूनर्वसनाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल गडचिरोली जिल्हा प्रशासनाला लवकरच गौरविले जाणार आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्त साधून ३ डिसेंबरला राजधानी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याहस्ते गडचिरोली जिल्हा प्रशासनाला या पहिल्या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
यु. डी. आय. डी. प्रमाणपत्र वितरण, दिव्यांग बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकार राबवित असलेल्या विविध योजनांविषयी दिव्यांग बांधवांना दारापर्यंत जनजागृती, दिव्यांग बांधवांची क्षमता बांधणी, पूनर्वसनात्मक योजना, साहित्य साधने वाटप अशा विविध निकषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारत हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.
गडचिरोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी संजय मिणा, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून व मिशन इंस्टिस्टयुट फॉर ट्रेनिग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) संस्थे द्वारा संचालित गडचिरोली जिल्हा दिव्यांग पूनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजित राऊत यांच्या सहयोगाने २० फेब्रुवारी ते १६ मार्च, २०२३ या कालावधीत दोन टप्प्यांत हे अभियान राबविण्यात आले. पहिल्या टप्प्यात मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासह ३० ठिकाणी प्राथमिक तपासणी शिबिरे आणि दुसऱ्या टप्प्यात १८ ठिकाणी शिबिरे आयोजित करून दिव्यांग व्यक्तींना दिव्यंगत्व प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध करून देण्यात आले. यात सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांपासून ते गाव पातळीवरील ग्रामपंचायत सदस्यांसह लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनीधी आणि सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग हे या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
तीन महिने चाललेया या अभियानात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार व तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, विद्यमान शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके, ग्रामीण रुग्णालयातील सर्व तज्ञ डॉक्टर्स, तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक तथा समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
असे राबविले मिशन-
– ४७ दिव्यांग तपासणी शिबिर, तब्बल ३ महिने चालला तपासणी ड्राईव्ह, पहिल्या टप्प्यात १० हजार दिव्यांग बांधवांचे उद्दिष्ट, त्यापैकी ९७०० दिव्यांग बांधवांची तपासणी, ७९७० दिव्यांग बांधव घरपोच प्रमाणपत्रासाठी पात्र, दिव्यांग बांधवांना १०० दिवसांच्या आत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आय. क्यू. टेस्टची ३० शिबिरे, दुर्गम आदिवासी पी. एच. सी.त ७२० बांधवांची आय. क्यू. तपासणी, १२ तालुक्यांमध्ये १८ दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिरांचे अभियान.