The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांना छुप्या मार्गाने दारू विक्री होते. लोकसभा निवडणुक २०२४ करिता येत्या १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निवडणुकीदरम्यान मतदाराना दारूचे अमिश दाखवून मते मागण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मुक्तीपथद्वारे दारूमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘दारूमुक्त निवडणूक’ व्हावी यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी व दारुबंदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहेत.
सौ. जयश्री ताई येरमे : (नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, गडचिरोली जिल्हा शाखा सदस्य)
योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी मतदाराने दक्ष व जागरूक राहून मतदान केले पाहिजे. यासाठी दारूमुक्त निवडणूक होणे गरजेचे आहे. दारूमुक्त निवडणुकीसाठी सर्वांना मी आवाहन करते.
सौ. सुधाताई चौधरी (माळी समाज संघटना व अं.नि.स. महिला विभाग सदस्य गडचिरोली) : निवडणुकी मध्ये काही उमेदवार अडाणी व अज्ञानी लोकांना दारूचे आमिष दाखवतात व मत मागतात. या लोकसभा निवडणुकीत मतदाराने दारू पिवून मतदान करू नये. उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांनी दारूमुक्त निवडणूक केली पाहिजे. कारण दारूमुळे कुटुंबाचा नायनाट होतो व महिलांचे हाल होतात. संविधानाने प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार वापरून शुद्धीत राहून मतदाराने मतदान केले पाहिजे व चांगला उमेदवार जो स्वत: निर्व्यसनी असेल व जिल्ह्याचा विकास करेल त्याला सर्वांनी निवडून दिले पाहिजे.
बाळकृष्ण सावसागडे (आम आदमी पार्टी नेता गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांनी व काही सामाजिक संस्थांनी मिळून जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. करिता निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराने जनतेला दारूचे प्रलोभन दाखवू नये. जनेतेने सुद्धा कुठल्याच आमिषाला बळी पडू नये. दारू न पिता किंवा कोणतेही व्यसन न करता मतदानाला जावे. असे केले तरच आपल्याला लोकसभा क्षेत्राचा विकास करू शकेल असा योग्य व सक्षम उमेदवार निवडला जाईल व सर्व जनतेचे भले होईल. मतदान सर्वांनी करावे. मतदाना पासून कुणीही वंचित राहू नये व योग्य उमेदवार निवडावा, असे मी सर्व जनतेला आवाहन करतो.
डॉ. सूर्य प्रकाश गभणे (सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली): संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा हा संपूर्ण दारूबंदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक सेवाभावी कार्यकर्ते, संस्था व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी टिकून आहे.जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक दारूमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनमताचा रेटा वाढून दारूबंदीची वाट अधिकाधिक सुकर करण्यासाठी दारू मुक्त निवडणूक या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. या कार्यास माझ्या वैयक्तिक शुभेच्छा.
विलासराव निंबोरकर (निवृत्त शिक्षक तथा अनिस संघटना सदस्य जिल्हा गडचिरोली) : आमची विनंती अशी आहे कि कोणत्याही उमेदवाराने मतदारांना दारू पाजू नये, आमिष दाखवू नये. उमेदवाराने आपल्या कामाने लोकांना प्रभावित केले पाहिजे, विकासाच्या योजना आणल्या पाहिजे व गडचिरोली जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. जनेतेने सुद्धा आपल्या गावाचा, जिल्ह्याचा विकास करेल, गावात दारू आणणार नाही, जिल्ह्याची दारूबंदी मजबूत करेल अशाच उमेदवाराला निवडूण दिले पाहिजे. उमेदवाराला आपण हे सुद्धा सांगितले पाहिजे कि, आम्ही निवडून जसे आणून देतो तसे पाडू सुद्धा शकतो. खासदारकी, आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू शकतो असे सर्व जनतेने उमेदवारांना सांगितले पाहिजे. दारूबंदी मुले, स्त्रिया सुरक्षित राहतात, पुरुष व्यसनमुक्त राहतात. यामुळे घरात पैसा राहील व मुलांना शिक्षण मिळेल सुबत्ता राहील. म्हणून मी आवाहन करतो कि, दारू पिवून मतदान करू नका, दारू पाजणाऱ्या किंवा वाटणाऱ्या उमेदवाराला मते देऊ नका. सर्वांनी मतदान अवश्य करावे व योग्य उमेदवार निवडावा.
श्रीमती प्यारूबेगम पठाण (रामनगर वार्ड मुक्तिपथ दारूबंदी संघटना) : जो उमेदवार दारू देईल त्याला लोकांनी मत द्यायला नाही पाहिजे. लोकसभेची निवडणूक शांततेने झाली पाहिजे. आमच्या वार्डात दारू नाही आली पाहिजे. वार्डात शांतता राहली पाहिजे.
एस.एन.चलाख, निवृत्त शिक्षणाधिकारी जि.प. गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यातून दारू हद्दपार झाली पाहिजे, तरच जिल्ह्यामध्ये आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होईल. म्हणून दारूमुक्त निवडणूक झाली पाहिजे व दारूबंदीचे समर्थन करणारा, निर्व्यसनी उमेदवार निवडला गेला पाहिजे.
श्रीमती कांता राजेंद्र चोपडे (भटेगांव ता.कुरखेडा) गाव दारूबंदी संघटना सदस्य : जो उमेदवार दारू देऊन मतदान करण्यास सांगत असेल त्याला कधीही मतदान करू नका. कारण निवडून आल्यावर त्या उमेदवाराकडून आपले काम होऊ शकेल याची काही शक्यता नसते. म्हणून दारूची लालसा, प्रलोभन दाखवणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नये. तसेच मत देण्यासाठी दारू, पैसे किंवा कोणतीही वस्तू घेऊ नका. जो उमेदवार पुढे आपला विकास करेल, आपले काम करू शकेल अशा पद्धतीने विचार करून उमेदवार निवडा अशी मी सर्वांना विनंती करतो व आवाहन करतो.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #loksabhaelection2024 )