The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ७ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही छुप्या मार्गाने दारूची तस्करी करत विक्री केल्या जाते. अशातच कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी साजा क्रमांक आठ मधील तलाठी किशोर राऊत दारूच्या नशेत कार्यालयात जाऊन सही मारतांनाच खुर्चीवरुन खाली पडल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. सदर घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी आहे, पोलीस अधीक्षक निलोत्पल आल्यापासून जिल्ह्यातील अवैध दारू वर धाडसत्र राबविण्यात येत आहेत. मात्र तरीही छुप्या मार्गाने दारूची विक्री केल्या जाते. कुरखेडा तालुक्यातील तलाठी कार्यालय सोनेरंगी साजा क्रमांक ८ येथील तलाठी किशोर राऊत हे गेल्या आठ- दहा दिवसापासून दारूच्या नशेत तलाठी कार्यालयास हजर राहत, शेतकऱ्यांना वेळेवर लागणारे दाखले व शेतीविषयक कामे होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बोंब होती. याबाबत संबंधित मंडळ अधिकारी यांना माहिती देण्यात आली होती. दरम्यान ६ सप्टेंबर रोजी काही शेतकरी शेतीविषयक कामांसाठी तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी राऊत हे एवढे दारूच्या नशेत होते की त्यांना सही करणेही अवघड होत होते. यावेळी सही करता करता ते खुर्चीवरून जमिनीवर खाली पडले. सदर प्रकाराने महसूल विभागाला मान खाली टाकावी लागत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kurkhedaz sonwrangi)