गडचिरोली : राष्ट्रपतींच्या दौऱ्याकरिता शेकाप नेते जराते यांना केले हद्दपार

2157

The गडविश्व
गडचिरोली , ४ जुलै : महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू उद्या ५ जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सुरजागडच्या अवैध लोह खाणींच्या तक्रारींचे निवेदन देतील या भितीमुळे जिल्हा प्रशासनाने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांना गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ४ जुलै च्या रात्री १० ते ५ जुलै च्या रात्री ११ वाजेपर्यंत हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेश गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांनी पारीत केले आहेत.
राष्ट्रपतींच्या गडचिरोली दौऱ्यात त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाला भेटीची वेळ व पास मिळावा म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ३० जून रोजी भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केलेला होता अशी माहिती आहे मात्र प्रशासनाने भेटीचा पास तर दिलाच नाही पण आज फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) नुसार नोटीस बजावत गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निष्काषीत केले आहे अशी माहिती शेकाप नेते रामदास जराते यांनी दिली आहे.
प्रशासनाने केलेल्या या हद्दपारीच्या कारवाईसंबंधात बोलतांना भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती या देशाच्या संविधानिक प्रमुख आहेत. त्या प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत ही आमच्यासह जिल्हावासीयांसह आनंदाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात व्यत्यय येण्यासारखे कृत्य आम्ही करण्याचे काहीही कारण नाही. केवळ अवैध लोह खाणी आणि पेसा, वनाधिकार संबंधातील निवेदन आम्ही महामहीम राष्ट्रपतींना देवून आदिवासींवरचा अन्याय उजेडात येवू नये म्हणून प्रशासनाने ही कारवाई केली असण्याची शक्यता आहे. असे असले तरी महामहीम राष्ट्रपतींच्या दौऱ्यात आपल्यामुळे कोणताही अडसर ठरू नये यासाठी नोटीसीचे पुरेपूर पालन करीत गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर जात आहोत.अशी प्रतिक्रिया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.
भाई रामदास जराते यांच्या प्रमाणेच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा, सीपीएम चे जिल्हा सचिव अमोल मारकवार, सैनू गोटा, ॲड. लालसू नोगोटी, नितीन पदा यांचेवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, ramdas jarate shekap, Gadchiroli: Shekap leader Zarate deported for President’s visit)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here