The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एक मोठी आंतरराज्यीय वाहनचोरांची टोळी गजाआड करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. पोमके सावरगाव येथे दाखल असलेल्या अप.क्र. 17/2025 अंतर्गत सुरू असलेल्या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी विनयप्रकाश धरमु कुजुर, रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली याला राजनांदगाव कारागृहातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागाची कबुली दिली.
तपास अधिक खोलवर जात असताना आरोपीकडून माहिती घेतली असता, तो आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोरी करून त्या वाहनांचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीवरून पोलिसांनी इतर सहा आरोपींना – रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे, संजय मुन्ना लकडा, राजेंद्र चूंदा लकडा आणि राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे यांना अटक केली. सर्व सात आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना २० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत गडचिरोली आणि छत्तीसगडमधील मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा, कोटगुल, धानोरा आणि इतर ठिकाणी दाखल असलेले एकूण १४ गुन्हे उघडकीस आले असून एकूण ४२ चोरीच्या दुचाकी वाहनांचा छडा लावण्यात आला आहे. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पुढील तपास पोउपनि विश्वंभर कराळे करत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, उपविभागीय अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा गडचिरोली आणि पोमके सावरगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गडचिरोली पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर मोठा आघात ठरली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ipl2025 #crimenews #accident )