गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे तळ केले नष्ट ; एक जवान शहीद

3893

– नक्षल्यांचे तळ केले नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दिरांगी आणि फुलनार जंगल परिसरात आज मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलिस नक्षल चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाले होते, त्यांना गडचिरोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे. महेश कवडू नागुलवार , नेमणूक- विशेष अभियान पथक गडचिरोली, (वय- ३९), रा- अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली आहे वीरगती प्राप्त झालेल्या जवानाचे नाव आहे.
भामरागड तालुक्यातील दिरांगी आणि फुलनार या गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षली तळ ठोकून आहेत अशी गुप्त माहिती गडचिरोली पोलिस दलास मिळाली होती. माहितीच्या आधारे काल पासून सदर परिसरात नक्षल विरोधी अभियान राबविण्यासाठी C ६० जवानांची तुकडी सदर परिसरात दाखल झाली असता आज मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पोलिस जवान महेश कवडू नागुलवार यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारकिता त्यांना गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असता उपचाराअंती त्यांना वीरमरण आले.
दरम्यान चकमकीत जवानांनी नक्षलवाद्यांचे तळ नष्ट केले असून घटनास्थळावरून नक्षल साहित्य व इतर वस्तू जप्त करण्यात आले आहेत.
उद्या १२ फेब्रुवारी रोजी त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांचे मूळ गाव अनकोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here