गडचिरोली पोलिसांनी दारू तस्करांच्या आवळल्या मुसक्या; वाहनासह ६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1479

– दोघेजण अटकेत, अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत ६७ लाख २० हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा व चारचाकी वाहन जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई हेटीनगर, पुराडा चौक येथे मंगळवारी केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दारूबंदी असूनही जिल्ह्यात अनेक भागांत छुप्या मार्गाने अवैध दारूची वाहतूक व विक्री सुरू आहे. याविरोधात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर २९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात दारू वाहून नेली जात असल्याचा सुगावा लागला. यानुसार पोलिस पथकाने हेटीनगर, पुराडा चौक येथे सापळा रचून संशयित वाहन एमएच-१८-बीझेड-७४७७ ला अडवून तपासणी केली असता, त्यात ६३० पेट्या देशी दारू आढळल्या.
गाडीमध्ये ८५ पेट्या टँगो पंच देशी दारू (किंमत अंदाजे ६.८० लाख) आणि ५६५ पेट्या रॉकेट देशी दारू (किंमत अंदाजे ४५.२० लाख) असा मोठ्या प्रमाणात साठा होता. तसेच १५ लाखांचे चारचाकी आयशर वाहन आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ६७,२०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी जितेंद्र शंकर लोहार (रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा, मुळ रा. शिरुड, जि. धुळे) आणि रोशन दुग्गा (रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा) यांच्याविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात कलम ६५(अ), ९८(२), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, स.पो.नि. समाधान दौड, सपोनि. रविंद्र म्हैसकर, पो.ह.वा. सुधाकर दंडीकवार, पोअं. प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, चा.पो.अं. माणिक निसार यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास सपोनि. रविंद्र म्हैसकर करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #LiquorSeizure #IllegalLiquorTrade #GadchiroliPoliceAction #LiquorBan #CrimeNews #PoliceRaid #AlcoholSmuggling #MaharashtraPolice #LocalCrime #DesiDarooSeized
#गडचिरोलीपोलीस #अवैधदारू #दारूबंदी #दारूचासाठा #पोलीसकारवाई #गुन्हेवार्ता #दारूचाव्यवसाय #दारूचीतस्करी #गडचिरोली बातमी #स्थानिकगुन्हेशाखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here